बिटकॉइन मध्ये मोठी घसरण! दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर किंमत, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
ऑक्टोबर 2025 मध्ये 1 लाख 26 हजार डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या बिटकॉइनमध्ये आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
Major drop in Bitcoin : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुन्हा निवडीनंतर क्रिप्टो बाजारात तेजी येण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण सुरू असून त्याने दोन वर्षांहून अधिक काळातील नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारात बिटकॉइन 6 टक्क्यांनी घसरला, तर शनिवारी आशियाई बाजारात आणखी 5.7 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे किंमत 55 हजार 533 डॉलरपर्यंत खाली आली. ऑक्टोबर 2025 मध्ये 1 लाख 26 हजार डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या बिटकॉइनमध्ये आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस Binance या मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजवर झालेला सायबर हल्ला, अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि क्रिप्टो उद्योगासाठी अनुकूल धोरणांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. याशिवाय, बिटकॉइन ETF मधूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर जात आहे. चालू वर्षात आतापर्यंत या फंडांमधून 3 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम काढून घेण्यात आली आहे. मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता आणि AI क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतची अनिश्चितता यामुळेही क्रिप्टो बाजारावर दबाव वाढला आहे.
पुण्यात डॉक्टरांच्या भरतीचा मोठा घोटाळा! 11 डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप
बिटकॉइनच्या घसरणीचा मोठा फटका लिव्हरेजवर व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना बसला आहे. Coinglass च्या आकडेवारीनुसार, अवघ्या 24 तासांत क्रिप्टो बाजारातील सुमारे 2 अब्ज डॉलरच्या लाँग पोझिशन्स लिक्विडेट झाल्या. बिटकॉइनची किंमत 60 हजार डॉलरच्या खाली जाताच Binance, Bybit आणि OKX या एक्सचेंजवर एका तासात 94.6 दशलक्ष डॉलरच्या बिटकॉइन पोझिशन्स लिक्विडेट झाल्या.
विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत परतल्यानंतर क्रिप्टोकरन्सीला अनुकूल धोरणे, संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि डिजिटल मालमत्तांसाठी कायदेशीर चौकट तयार करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली गेली होती. मात्र, तरीही बिटकॉइनची घसरण थांबलेली नाही. याआधीच्या घसरणींमागे मोठ्या क्रिप्टो कंपन्यांचे अपयश किंवा अचानक झालेली विक्री ही कारणे होती. मात्र, यावेळी बाजारातील मागणी कमी होणे आणि गुंतवणूकदारांचा ओसरता उत्साह हे प्रमुख घटक मानले जात आहेत.
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! सर्व 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित, महाराष्ट्रातील चहाविक्रेत्याचाही समावेश
जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळातही गुंतवणूकदारांनी बिटकॉइनऐवजी सोने आणि पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांना पसंती दिली आहे. आता मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार बिटकॉइनमध्ये पुन्हा किती गुंतवणूक करतात, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. ही घसरण तात्पुरती आहे की क्रिप्टो बाजारातील मोठ्या मंदीची सुरुवात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.