Smart Phone Access : मोबाईलमध्ये ‘Allow’ बटण दाबताच सुरू होतो प्रायव्हसीचा खेळ; पण, कसा?

Smart Phone App Permission तुम्ही एखाद्या अ‍ॅपला दिलेली एक छोटीशी परवानगी तुमच्या खासगी आयुष्याची बरीच माहिती बाहेर पोहोचवू शकते

  • Ninad K
  • Written By: Published:
Smart Phone Allow Access 

How To Secuered Privacy While Smart Phone Allow Access  :  तुम्ही एखादं नवीन अ‍ॅप डाउनलोड केलं अ‍ॅप ओपन केलं आणि लगेच स्क्रीनवर मेसेज आला…’Allow Access to Photos’ तुम्ही विचार न करता Allow केलं.. त्यानंतर दुसरा मेसेज आला… ‘Allow Location Access’ तिथेही तुम्ही Allow केलं आणि असंच करत करत तुम्ही त्या अ‍ॅपला तुमच्या फोनमधील फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनचा अ‍ॅक्सेस देऊन टाकला.

पण एक मिनिट… तुम्ही कधी विचार केलाय का? ज्या कामासाठी तुम्ही अ‍ॅपला ही परवानगी दिली, त्याच कामासाठी तो डेटा वापरला जातोय की त्यामागे आणखी काही वेगळाच खेळ सुरू आहे? कारण तुम्ही एखाद्या अ‍ॅपला दिलेली एक छोटीशी परवानगी तुमच्या खासगी आयुष्याची बरीच माहिती बाहेर पोहोचवू शकते आणि याच मुद्द्यावरून आता जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? मोबाईलमधील परमिशन्स कशा काम करतात? तुमचा डेटा दुसऱ्या कंपन्यांपर्यंत कसा पोहोचतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया….

सर्वात आधी इटलीमधील मेटाच्या प्रकरणापासून सुरुवात करूया. इटलीमध्ये मेटा कंपनीवर तब्बल 805 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावल्याची बातमी समोर आली आहे. फेसबुक वापरताना तुम्हाला अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्याचा पर्याय दिसतो. पण 2023 मध्ये फेसबुकने एक फीचर आणलं होतं. त्याचं नाव होतं ‘Get Suggestions from Gallery’. या फीचरचं काम काय होतं? तर, तुम्ही फेसबुक स्क्रोल करत असताना तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमधील फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला सजेशन म्हणून दाखवले जात होते. म्हणजे समजा, तुम्ही एखादा फोटो फेसबुकवर पोस्ट करायचा विचार करत आहात. तर फेसबुक तुम्हाला तुमच्या गॅलरीमधील फोटो आधीच सुचवणार…

पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण झाला, इटलीच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीच्या तपासणीनुसार, फोटो अपलोड करण्यासाठी आणि गॅलरीमधून फोटो सुचवण्यासाठी फेसबुकने एकाच Android परमिशनचा वापर केला होता. मात्र, ही परमिशन देताना गॅलरीमधील फोटो सुचवणारं फीचरही सुरू होईल, याची पुरेशी स्पष्ट माहिती युजर्सना देण्यात आली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. म्हणजे युजरला वाटत होतं की, आपण फक्त फोटो अपलोड करण्यासाठी परवानगी देतोय, पण त्याच परवानगीचा वापर दुसऱ्या फीचरसाठीही होत होता.

याच प्रकरणामुळे मेटाच्या डेटा वापरण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. मग आपण एखाद्या अॅपला फोनमधील डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी दिली म्हणजे तो आपोआप विकला जातो का? तर, असं अजितबात नाहीये. पण त्या डेटाचा वापर कसा होतो, कोणासोबत शेअर होतो आणि त्यासाठी नेमकी कोणती संमती घेतली जाते, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

समजा तुम्ही एखादं शॉपिंग अ‍ॅप डाउनलोड केलं. तुम्हाला जवळचं स्टोअर शोधायचं आहे. त्यामुळे अ‍ॅप तुमच्याकडे लोकेशनची परवानगी मागतं. तुम्ही Allow केलं. आता त्या अ‍ॅपला तुमच्या लोकेशनचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो. पण इथे आणखी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, अनेक अ‍ॅप्समध्ये केवळ त्या अ‍ॅपने तयार केलेला कोड नसतो. त्यामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी तयार केलेले काही सॉफ्टवेअर कोडचे पॅकेजेसही असतात ज्यांना SDK म्हणजेच Software Development Kit असं म्हटलं जात. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या अ‍ॅपमध्ये जाहिराती दाखवणं, युजर काय पाहतोय हे समजून घेणं, पेमेंट करणं किंवा अ‍ॅपमधील त्रुटी शोधणं अशा कामांसाठी बाहेरच्या कंपन्यांचे कोड वापरले जातात.

आता समजा, एका अ‍ॅपमध्ये अशा अनेक कंपन्यांचे SDK आहेत. तर अ‍ॅपने गोळा केलेल्या काही माहितीवर या SDK द्वारेही प्रक्रिया केली जाऊ शकते किंवा ती माहिती संबंधित बाह्य सेवांपर्यंत पोहोचू शकते. यामध्ये डिव्हाइसची माहिती, अ‍ॅपचा वापर कसा केला जातो, जाहिरातींशी संबंधित ओळख क्रमांक आणि काही परिस्थितींमध्ये लोकेशनसारखा डेटाही असू शकतो.

मात्र, याचा अर्थ प्रत्येक SDK तुमचा डेटा चोरतो किंवा विकतो असा अजिबात नाही. पण तुम्ही एखाद्या अ‍ॅपला परवानगी दिल्यानंतर तुमचा डेटा नेमका कुठे जातो, याची माहिती प्रत्येक वेळी तुम्हाला सहज दिसत नाही आणि हाच या संपूर्ण व्यवस्थेतील महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या अ‍ॅपला लोकेशनची परवानगी दिली. तर, तुमचं लोकेशन केवळ तुम्ही सध्या कुठे आहात, एवढंच सांगत नाही. जर लोकेशनचा डेटा सतत गोळा केला गेला, तर त्यावरून तुम्ही कुठे जाता, किती वेळ थांबता, कोणत्या ठिकाणी वारंवार जाता, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

उदाहरणार्थ… तुम्ही वारंवार एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी बराच वेळ घालवत असाल तर, अशा लोकेशन डेटावरून तुमच्या खासगी आयुष्याबद्दल संवेदनशील अंदाज बांधले जाऊ शकतात. याच संदर्भात अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन म्हणजेच FTC ने X-Mode Social आणि तिच्या उत्तराधिकारी कंपनी Outlogic विरुद्ध संवेदनशील ठिकाणांशी संबंधित अचूक लोकेशन डेटा योग्य परवानगीशिवाय गोळा करून विकल्याचा ठपका ठेवत जानेवारी 2024 मध्ये कारवाई करण्यात आली होती.

आता तुम्ही म्हणाल की मग मोबाईल कंपन्या काय करतात? तर, Android आणि iPhone या दोन्हीमध्ये प्रायव्हसीसाठी अनेक पर्याय दिलेले आहेत. तुम्ही Android फोन वापरत असाल तर, अ‍ॅपला तुमचं अचूक लोकेशन देण्याऐवजी साधारण लोकेशन देऊ शकता. काही अ‍ॅप्ससाठी ‘Allow only while using the app’ हा पर्याय निवडता येतो. म्हणजे तुम्ही अ‍ॅप वापरत असतानाच त्याला लोकेशनचा अ‍ॅक्सेस मिळेल. तसंच फोटो अपलोड करायचे असतील, तर संपूर्ण गॅलरीचा अ‍ॅक्सेस देण्याऐवजी फक्त निवडक फोटो शेअर करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. यासाठी Android मधील Photo Picker हा पर्याय उपयोगी ठरतो.

दुसरीकडे, iPhone मध्येही तुम्ही अ‍ॅपला कोणते फोटो दिसावेत, हे निवडू शकता. एवढचं नव्हे तर, एखादं अ‍ॅप कॅमेरा किंवा माइक वापरत असेल, तर स्क्रीनवर हिरवा किंवा नारंगी इंडिकेटर दिसतो. हिरवा इंडिकेटर म्हणजे कॅमेरा वापरला जात आहे तर, नारंगी इंडिकेटर म्हणजे माइक वापरला जात आहे. पण लक्षात ठेवा, हे इंडिकेटर्स आणि परमिशन सेटिंग्स तुम्हाला फोनमधील अ‍ॅक्सेसवर नियंत्रण देतात. डेटा एकदा अ‍ॅपच्या सर्व्हरवर गेल्यानंतर तो कोणासोबत शेअर होतो, याची संपूर्ण माहिती या सेटिंग्स देत नाहीत.

आता या सगळ्यामध्ये प्रायव्हसी पॉलिसी आणि लागू असलेले कायदे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच, आज परमिशन बंद करणं चांगलं आहेच पण, आधी गोळा झालेल्या डेटाबाबत वेगळी कारवाई करावी लागू शकते. भारतात यासाठी Digital Personal Data Protection Act म्हणजेच DPDP Act 2023 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार कंपन्यांनी युजर्सकडून डेटा वापरण्यासाठी स्पष्ट आणि माहितीपूर्ण संमती घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणता डेटा घेतला जातोय, तो कशासाठी वापरला जाणार आहे आणि त्याचा वापर कोणत्या पद्धतीने होणार आहे, याची माहिती युजरला मिळायला हवी. तसंच डेटा प्रोसेस करण्यासाठी बाहेरच्या कंपन्यांची मदत घेतली, तरी संबंधित डेटा फिड्युशियरीची जबाबदारी संपत नाही.

सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये DPDP Rules अधिसूचित केले असून, त्यातील काही तरतुदी टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांसाठी डेटा गोळा करणं आणि वापरणं अधिक जबाबदारीचं ठरणार आहे.  आता एवढं सगळं समजल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण नेमकं काय करायचं? तर  गरज नसलेल्या परमिशन्स बंद करा. शक्य असेल तिथे ‘Allow only while using the app’ हा पर्याय निवडा. गरज नसल्यास Precise Location बंद करा. संपूर्ण गॅलरीचा अ‍ॅक्सेस देऊ नका तसेच, न वापरणारे अ‍ॅप्स डिलीट करा आणि वेळोवेळी Privacy Dashboard अवश्य तपासा.

कारण आजच्या डिजिटल जगात आपला स्मार्टफोन म्हणजे केवळ फोन राहिलेला नाही. तर त्यात आपले फोटो आहेत, आपले मेसेज आहेत, आपले कॉन्टॅक्ट्स आहेत, आपलं लोकेशन आहे आणि आपल्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी आहेत. या सगळ्या माहितीचा अ‍ॅक्सेस आपण अनेकदा एका छोट्याशा ‘Allow’ बटणावर क्लिक करून देतो म्हणून पुढच्या वेळी एखादं अ‍ॅप तुमच्याकडे परमिशन मागेल, तेव्हा लगेच Allow करू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा… या अ‍ॅपला खरंच माझ्या या माहितीची गरज आहे का? कारण लक्षात ठेवा… तुमचा डेटा ही तुमची डिजिटल संपत्ती आहे आणि त्याची चावी दुसऱ्याच्या हातात देण्याआधी विचार करणं हीच तुमच्या प्रायव्हसीची खरी सुरक्षा आहे…

follow us