अनोखळी नंबरवरून मेसेज आल्यास WhatsApp चं सांगणार चॅट करायचं की नाही…वाचा डिटेल्स

Whatsapp New Scam Warning Feature नोळखी नंबरवरून आलेला मेसेज उघडण्यापूर्वी WhatsApp वापरकर्त्याला 'Scam Alert' दाखवणार आहे.

  • Written By: Published:
Whatsupp

Whatsapp New Scam Warning Feature : ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे WhatsApp आपल्या सुरक्षा फीचर्समध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आता एक नवे ‘Scam Alert’ फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज उघडण्यापूर्वीच वापरकर्त्याला तो नंबर कितपत विश्वासार्ह असू शकतो, याची महत्त्वाची माहिती आणि सुरक्षा इशारा (Warning) मिळणार आहे. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे.

फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फीचर सध्या Android आणि iPhone या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मर्यादित वापरकर्त्यांमध्ये चाचणीच्या टप्प्यात आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आगामी अपडेटमध्ये ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

चॅट उघडण्यापूर्वीच मिळणार महत्त्वाची माहिती

एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आल्यास WhatsApp सर्वप्रथम एक सुरक्षा सूचना (Warning Screen) दाखवेल. त्यामध्ये संबंधित मोबाईल नंबर कोणत्या देशात नोंदणीकृत आहे, तो नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहे की नाही, तसेच त्या व्यक्तीसोबत तुमचा एखादा कॉमन WhatsApp ग्रुप आहे का, याची माहिती दिली जाईल. यामुळे समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता ओळखणे वापरकर्त्यांना अधिक सोपे होईल.

स्कॅमर्सच्या डावपेचांबाबतही करणार सावध

या फीचरमध्ये वापरकर्त्यांना फसवणुकीच्या सामान्य पद्धतींबाबतही सतर्क केले जाईल. स्कॅमर्स अनेकदा वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील, OTP, पासवर्ड किंवा पैशांची मागणी करून लोकांची फसवणूक करतात, असा स्पष्ट इशाराही WhatsApp देणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणतीही कृती करण्यापूर्वी अधिक सावध राहता येईल.

चॅट सुरू करायची की बंद करायची? निर्णय पूर्णपणे तुमचा

सुरक्षा सूचना पाहिल्यानंतर वापरकर्ता इच्छेनुसार संबंधित चॅट सुरू ठेवू शकतो किंवा ती बंद करू शकतो. विशेष म्हणजे, तुम्ही चॅट बंद केली किंवा प्रतिसाद दिला नाही, याची कोणतीही सूचना समोरील व्यक्तीला मिळणार नाही.

इतर नवीन फीचर्सवरही सुरू आहे काम

सुरक्षेसोबतच वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी WhatsApp आणखी काही नवीन फीचर्सवर काम करत आहे. अहवालानुसार, Android वापरकर्त्यांसाठी Voice Note Widget आणि iPhone वापरकर्त्यांसाठी View Once Text Message यांसारख्या फीचर्सचीही चाचणी सुरू आहे.

follow us