वयाच्या चाळीशी नंतर मित्र परिवार कमी का होऊ लागतो? समोर आलं महत्त्वाचं कारण

कोणतीही अडचण आली की पहिला फोन ज्यांना केला जायचा, तीच माणसं वयाच्या चाळिशीनंतर आयुष्यातून हळूहळू गायब झाल्यासारखी वाटू लागतात.

  • Written By: Published:
Friendship

Why Loneliness Increase After Age Of 40 : एक काळ असा होता की, एखाद्या मित्राशी दिवसातून एकदा तरी बोलल्याशिवाय चैन पडत नव्हती. शाळा-कॉलेजमधील मित्र, ऑफिसनंतरच्या गप्पा, अचानक आखलेले प्रवास आणि कोणतीही अडचण आली की पहिला फोन ज्यांना केला जायचा, तीच माणसं वयाच्या चाळिशीनंतर आयुष्यातून हळूहळू गायब होऊ लागतात. पण, नक्की वयाची 40 ओलांडल्यानंतर असं काय होतं ज्यामुळे मित्र परिवार कमी होऊ लागतो. त्याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया…

जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात मैत्री मागे पडते

चाळिशी हा आयुष्यातील सर्वाधिक धावपळीचा टप्पा मानला जातो. करिअरमध्ये स्थिरता मिळवण्याची धडपड, मुलांच्या शिक्षणाची चिंता, घरखर्च, कर्जाचे हप्ते, वृद्ध होत चाललेल्या आई-वडिलांची काळजी आणि स्वतःच्या आरोग्याच्या समस्या यामुळे दिवसातील प्रत्येक तास आधीच ठरलेला असतो. अशा परिस्थितीत सर्वात आधी कमी होतो तो मित्रांसाठी दिला जाणारा वेळ. पूर्वी तासंतास चालणाऱ्या गप्पांची जागा आता ‘कधीतरी भेटूया’ या संदेशाने घेतलेली असते. अनेकदा महिने उलटून जातात, पण भेट होऊ शकत नाही.

कुटुंब आहे, पण मन मोकळं करण्यासाठी मित्रही हवेत

अनेकांना वाटतं की कुटुंब सोबत असेल तर एकटेपणाची भावना येऊ नये. मात्र मानसशास्त्रज्ञ याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. कुटुंब आणि मित्र यांच्या भूमिका वेगळ्या असतात. काही भावना, भीती, अपयश किंवा वैयक्तिक संघर्ष असे असतात, जे मित्रांशी सहज शेअर करता येतात. म्हणूनच ज्या व्यक्तींच्या आयुष्यात घट्ट मैत्री टिकून असते, त्या तणाव आणि भावनिक चढ-उतारांचा सामना अधिक सक्षमपणे करू शकतात.

सोशल मीडियाने जोडलेही, पण दुरावलेही

आज बहुतेक लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेकडो मित्र असतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे एका क्लिकवर दिसतं. पण ही जोडणी अनेकदा वरवरची ठरते. ‘लाईक’, ‘कॉमेंट’ आणि ‘हॅपी बर्थडे’च्या शुभेच्छांपुरते अनेक संबंध मर्यादित राहतात. प्रत्यक्ष भेटी, मनमोकळ्या गप्पा आणि भावनिक आधार यांची जागा सोशल मीडिया घेऊ शकत नाही. त्यामुळे लोकांच्या संपर्क यादीत अनेक नावे असली तरी गरजेच्या वेळी फोन करण्यासाठी फारच कमी माणसं उरतात.

चाळिशीनंतर मित्रांची संख्या नाही, गुणवत्ता महत्त्वाची ठरते

तज्ज्ञांच्या मते, चाळिशीनंतर मित्र कमी होणे हा चिंतेचा विषय नाही. उलट या वयात लोकांना कोणती नाती खरी आहेत आणि कोणती केवळ औपचारिक आहेत, याची स्पष्ट जाणीव होते. त्यामुळे मोठ्या मित्रपरिवारापेक्षा काही निवडक आणि विश्वासू मित्रांना लोक अधिक महत्त्व देऊ लागतात. या नात्यांमध्ये दिखाऊपणा नसतो, अपेक्षा कमी असतात आणि विश्वास जास्त असतो. त्यामुळे कमी मित्र असूनही अनेकजण अधिक
समाधानी आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतात.

एकटेपणाचा परिणाम केवळ मनावरच नाही

अनेक संशोधनांमध्ये सामाजिक एकाकीपणाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. सततचा एकटेपणा तणाव, चिंता, नैराश्य यांचा धोका वाढवू शकतो. काही अभ्यासांमध्ये त्याचा झोप, रक्तदाब आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणूनच तज्ज्ञ चाळिशीनंतरही सामाजिक नाती जपण्यावर भर देतात. जुन्या मित्रांना फोन करणे, नियमित भेटींचे नियोजन करणे, नवीन छंद जोपासणे किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

नात्यांमध्ये केलेली गुंतवणूकच आयुष्यभर साथ देते

आपण करिअर, घर, बचत आणि भविष्याच्या नियोजनासाठी खूप मेहनत घेतो. मात्र अनेकदा नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात आयुष्यातील कठीण प्रसंगी आर्थिक संपत्तीपेक्षा भावनिक आधार देणारी माणसं अधिक महत्त्वाची ठरतात. चाळिशीनंतर मित्र कमी होणं स्वाभाविक आहे, पण नाती संपणं आवश्यक नाही. कधी कधी एक साधा फोन, एक कप चहा किंवा मनापासून विचारलेला “कसा आहेस?” हा प्रश्नही जुन्या मैत्रीला नवसंजीवनी देऊ शकतो. कारण आयुष्याच्या उत्तरार्धात लोकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे खरी श्रीमंती बँक खात्यातील आकड्यांमध्ये नसते, तर आपल्यासाठी वेळ काढणाऱ्या आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय सोबत उभ्या राहणाऱ्या माणसांमध्ये असते.

follow us