ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर वीज संकटाचे सावट, महानिर्मितीकडे अवघे चार दिवस पुरेल एवढाचं कोळशाचा साठा
औष्णिक वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाचा साठा कमी होत असल्याने महाराष्ट्रासमोर नव्या ऊर्जा संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
A power crisis looms over Maharashtra right during Diwali : राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढत असताना दुसरीकडे औष्णिक वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाचा साठा कमी होत असल्याने महाराष्ट्रासमोर नव्या ऊर्जा संकटाचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अर्थात महानिर्मितीच्या सात औष्णिक वीज प्रकल्पांकडे अवघ्या चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या 29 ऑक्टोबरच्या अहवालातून समोर आली आहे. देशातील औष्णिक वीज प्रकल्पांकडे सरासरी आठ दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध असताना महाराष्ट्रातील महानिर्मितीकडे निर्धारित साठ्याच्या केवळ 17 टक्के कोळसा शिल्लक असल्याचे अहवालात नमूद आहे.
त्यामुळे आगामी दिवाळीच्या काळात विजेची मागणी वाढल्यास वीज निर्मितीवर परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या राज्यात विजेची मागणी साधारण 28 ते 30 हजार मेगावॅटच्या दरम्यान आहे. औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने वीज निर्मिती यंत्रणेवर ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत औष्णिक वीज प्रकल्पांमधील कोळशाचा साठा कमी होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, देशातील औष्णिक वीज प्रकल्पांकडे त्यांच्या निर्धारित साठ्याच्या सरासरी 31 टक्के कोळसा उपलब्ध असताना महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये हे प्रमाण अवघे 17 टक्के आहे.
गुटखा तस्करीचे भिवंडीत मोठे रॅकेट? 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्तर प्रदेशातील 39 वर्षीय आरोपीला अटक!
महानिर्मितीच्या सात औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये पाच प्रकल्पांपैकी कोळशाचा साठा गंभीर श्रेणीत असल्याची माहिती समोर आली आहे. या सातही प्रकल्पांमध्ये मिळून सध्या सुमारे 5 लाख 81 हजार 40 टॅन कोळसा उपलब्ध आहे. हा साठा सध्याच्या वापराच्या तुलनेत अवघ्या चार दिवसांसाठी पुरेसा असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. देशातील वीज प्रकल्पांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोळसा साठ्याचे प्रमाण कमी असल्याने वीज निर्मिती सातत्याने सुरू ठेवण्याचे आव्हान महानिर्मितीसमोर आहे. कोळशाचा पुरवठा वेळेत न झाल्यास काही प्रकल्पांच्या वीजनिर्मितीवर मर्यादा येण्याची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे कोळसा उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून नियोजन सुरू असल्याचे महानिर्मितीकडून सांगण्यात आले आहे.
दिवाळीचा सण जवळ येत असल्याने कोळशाच्या अपुऱ्या साठ्याचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत आहे. सणासुदीच्या काळात घरगुती रोषणाई, व्यावसायिक आस्थापना, बाजारपेठा आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमुळे विजेच्या वापरात बदल होतो. अशा वेळी राज्यातील वीज मागणी आणि उपलब्ध वीज निर्मिती यांच्यात समतोल राखणे आवश्यक असते. महाराष्ट्रात सध्या 28 ते 30 हजार मेगावॅटच्या आसपास असलेली विजेची मागणी लक्षात घेता कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीच्या काळात कोळशाची उपलब्धता पुरेशी न राहिल्यास औष्णिक वीज निर्मितीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या अंधारात मृत्यूचा थरार! उड्डाणपुलाचा कठडा तोडून कंटेनर हॉटेलवर आदळला, दोघांचा जागीच अंत
मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठा खंडित होईल किंवा भारनियमन लागू होईल, असे अद्याप निश्चित झालेले नाही. कोळशाचा साठा कमी असला तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात असल्याचा दावा महानिर्मितीकडून करण्यात आला आहे. कोळसा खाणींकडून प्रकल्पांपर्यंत होणारा पुरवठा वाढवणे, रेल्वे रॅकची उपलब्धता सुधारणे आणि केंद्र व राज्य यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे यावर भर दिला जात आहे. आगामी काळात कोळशाची आवक वाढल्यास प्रकल्पांमधील साठा सुधारण्यास मदत होऊ शकते.