फरार अभिषेक कळमकरवर कायद्याचा फास आवळला; हजर न राहिल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई अटळ
आरोपी हाती लागत नसल्याने आता न्यायालयाने कठोर भूमिका घेतली असून कळमकरविरोधात वॉन्टेड नोटीस जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Abhishek Kalamkar is caught in the crossfire of the law : महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत आहेत. राज्यभर शोधमोहीम राबवून देखील आरोपी हाती लागत नसल्याने आता न्यायालयाने कठोर भूमिका घेतली असून कळमकरविरोधात वॉन्टेड नोटीस जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 84 अंतर्गत पोलिसांना कार्यवाही करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आरोपीचे नाव, फोटो आणि पत्ता असलेले वॉन्टेड फलक सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत. या निर्णयामुळे कळमकरवरील कायदेशीर कारवाई आणखी तीव्र होणार आहे.
याआधीच न्यायालयाने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याआधारे पोलिसांनी महाराष्ट्रभर शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, आरोपीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढील पायरी म्हणून आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.
न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मान्य करत आरोपीविरोधात जाहीरनामा काढण्याचे आदेश दिले आहेत. या जाहीरनाम्यात अभिषेक बाळासाहेब कळमकर (रा. भुतकरवाडी चौक, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) याला तात्काळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक ३ समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार हा जाहीरनामा आरोपीच्या राहत्या घरावर, न्यायालयाच्या इमारतीवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध केला जाणार आहे. या वॉन्टेड नोटीसमध्ये आरोपीचा फोटो, त्याच्यावरील गुन्ह्याचा तपशील आणि न्यायालयात हजर राहण्याची मुदत स्पष्टपणे नमूद केली जाईल.
कायद्यानुसार, जाहीरनाम्यानंतर देखील आरोपी न्यायालयात हजर झाला नाही, तर त्याला अधिकृतपणे फरार आरोपी घोषित केले जाईल. त्यानांतर पुढील टप्प्यात त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात कळमकरसमोर कायदेशीर अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना देखील आवाहन केले असून, आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगरसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, आता वॉन्टेड नोटिशीनंतर आरोपी समोर येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.