मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीला बिल्डरकडून दीड कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले
पोलिसांकडून मदत मिळवून देण्यासाठी अभिनेत्री हेमलता आणि तिच्या साथीदाराकडून गोयल यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
Actress Hemlata Patkar caught red-handed by police while taking extortion : सिनेसृष्टीतील अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र एका वेगळ्याच प्रकरणात एक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री चर्चेत आली आहे. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाला शोभेल असा थरार मुंबईच्या(Mumbai) गोरेगाव परिसरात पाहायला मिळाला. 10 कोटी रुपयांची खंडणी मागत एका बिल्डरला धमकावणाऱ्या २ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेपैकी मुख्य आरोपी मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर(Hemlata Patkar) आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अरविद गोयल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बिल्डर गोयल यांच्या मुलावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा मिटवण्यासाठी आणि पोलिसांकडून मदत मिळवून देण्यासाठी अभिनेत्री हेमलता आणि तिच्या साथीदाराने गोयल यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. बिल्डरने घाबरून न जाता थेट गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचला आणि दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना हेमलता पाटकर आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी यांना रंगेहाथ पकडले.
39 वर्षीय हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे ही कांदिवलीची रहिवासी असून मराठी सिनेसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. विशेष म्हणजे, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांची ती सून आहे. तर, 33 वर्षीय अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस ही सांताक्रूझची रहिवासी असून हेमलताची जवळची मैत्रीण आणि या कटातील भागीदार आहे. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर ही सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही तिच्यावर मेघवाडी पोलीस ठाण्यात मारहाण (कलम 323), अनाधिकृत प्रवेश (कलम 452) आणि दमदाटी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
या दोन्ही महिलांना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, या दोघीही तपासात अजिबात सहकार्य करत नाहीत. पोलिसांनी अद्याप हेमलताच्या हस्ताक्षराचे नमुने आणि अमरिनाच्या आवाजाचे नमुने गोळा करायचे आहेत. या दोघींनी मिळून इतरही कोणाला लुटले आहे का? किंवा त्यांच्या मागे आणखी कोणी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही आरोपींना आता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
