शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका

शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. (after ajit pawar join shinde government many mp and mla from shinde group unhappy)

काल मंत्रालयात शिंदेंची भेट घेत बहुतांश आमदारांनी आपली अस्वस्थता शिंदेंकडे बोलून दाखविली आहे. बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल करत संजय शिरसाट यांच्यासारख्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे माध्यमांसमोर बोलून दाखविली. त्यामुळे सर्व आमदार आणि खासदार शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे,

अस्वस्थता का? 

शिंदेंसोबत गेलेले 13 आमदार आणि 5 खासदार गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरवून निवडून आले आहेत. अशात अजित पवार यांनी पुढील निवडणुका या युतीत आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार असल्याचं सुतोवाच केलं आहे. मात्र भाजपसोबत जे खासदार आणि आमदार आहेत त्यांना सध्या जिथून निवडून आले आहेत तिथूनच तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीत ती जागा शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादीकडे? असा सवाल हे आमदार आणि खासदार विचारत आहेत.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करुन निवडून आलेले आमदार :

1. पाटण (सातारा) – शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर

2. पैठण (छ. संभाजीनगर) – संदीपान भुमरे विरुद्ध नारायण गोर्डे

3. कोरेगांव (सातारा) – महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे

4. कर्जत-खालापूर (रायगड) – महेंद्र थोरवे विरुद्ध सुरेश लाड

5. परांडा (धाराशीव) – तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे

6. वैजापूर (छ. संभाजीनगर) – रमेश बोरनारे विरुद्ध अभय पाटील

7. राधानगरी (कोल्हापूर) – प्रकाश आबिटकर विरुद्ध केपी पाटील

8. नांदगाव (नाशिक) – सुहास कांदे विरुद्ध पंकज भुजबळ

9. एरंडोल (जळगाव) – चिमणराव पाटील विरुद्ध सतीश पाटील

10. चोपडा (जळगाव) – लता सोनवणे विरुद्ध जगदीश वळवी

11. दापोली (रत्नागिरी) – योगेश कदम विरुद्ध संजय कदम

12. कुर्ला – मंगेश कुडाळकर विरुद्ध मिलिंद कांबळे

13. रत्नागिरी – उदय सामंत विरुद्ध सुदेश मयेकर

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करुन निवडून आलेले खासदार :

1. नाशिक – हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ

2. मावळ – श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार

3. हातकणंगले – धैर्यशिल माने विरुद्ध राजू शेट्टी (या मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे)

4. कोल्हापूर – संजय मंडलिक – विरुद्ध धनंजय महाडिक (आता हसन मुश्रीफ हे उमेदवार असण्याची शक्यता)

5. बुलढाणा – प्रतापराव जाधव विरुद्ध राजेंद्र शिंगणे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube