सर्वसामान्यांची चिंता वाढली, गॅसनंतर आता पेट्रोलचा भडका; स्पीड आणि पॉवर पेट्रोल 113 रुपयांवर

विशेष म्हणजे ही वाढ साध्या पेट्रोलमध्ये नसून प्रीमियम पेट्रोल म्हणजेच स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 57

After gas, now petrol is expensive : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या दरांवर होत असून, पुण्यासह मुंबई आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वाढ साध्या पेट्रोलमध्ये नसून प्रीमियम पेट्रोल म्हणजेच स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 9 पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले असून, आता स्पीड आणि पॉवर पेट्रोलची किंमत 113 रुपये 77 पैशांवर पोहोचली आहे. गुरुवारी या पेट्रोलची किंमत 111 रुपये 68 पैसे इतकी होती. म्हणजेच एका दिवसातच प्रीमियम पेट्रोलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना करमणुकीत गुंतवलं जातंय, राज ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, साध्या पेट्रोलच्या किंमती मात्र सध्या स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. तरीही प्रीमियम पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले असून, प्रीमियम पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांना आता प्रति लिटर दोन रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यातच गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर आता पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि गॅसच्या वाढत्या किमतींचा परिणाम वाहतुकीच्या खर्चावर होणार असून, त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा दुहेरी परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

follow us