अहमदनगर नामांतर रथयात्रा; पडळकर-शिंदे विखेंचा गेम करणार ?

अहमदनगर नामांतर रथयात्रा; पडळकर-शिंदे विखेंचा गेम करणार ?

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत तसे या माध्यमातून सुरू असलेले शह-काटशहाचे राजकारणही दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आदी नेत्यांनी केली आहे. राज्य सरकारही यासाठी अनुकूल आहे. असे असताना या मु़द्द्यावर काही विरोधी मतप्रवाहही आहेत.राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांची यांचा या मागणीला विरोध असल्याचे त्यांच्या अडकडील वक्तव्यावरून दिसते. जिल्ह्याचे नामांतर नाही तर जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे असे मत त्यांनी अलीकडेच व्यक्त केले होते. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही नामांतराच्या मु़द्द्यावर असहमती दर्शवली होती. त्यानंतर त्यांना विरोध वाढत गेला. या सगळ्या पार्श्वभुमीवर रथयात्रा निघत असून या माध्यमातून मंत्री विखे यांची राजकीय अडचण होताना दिसत आहे.

बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत या महत्त्वाच्या आहेत. याविषयी मी स्वतः गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार आहे. नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे. जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण केली जात आहे. राज्यात अनेक जिल्हे मोठे आहेत. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा केली जात आहे. जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करत आहोत ? ठाण्यामध्ये सात महापालिका होत्या तशी परिस्थिती नगरमध्ये नाही. नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायला आम्ही घेतला आहे. औद्योगिक पर्यटन या जिल्ह्याच्या क्षमतेतून रोजगार निर्मिती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण केली जात आहे, असे वक्तव्य मंत्री विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांनी सुद्धा अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदल करावे किंवा विभाजन करावे अशी मागणी माझ्याकडे कुणीही, कधीही केली नाही. ही मागणी स्थानिक नागरिकांचीही नाही, असे विखे-पाटील यांनी म्हटले होते.

विखे यांच्या या भुमिकांनंतर जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. काही संघटनांनी त्यांच्या या वक्तव्यांचा विरोध केला होता. तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही वेगळे मत व्यक्त केले होते. आपण अहमदनगरचे पालकमंत्री असतानाच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. आता ही विभाजन आणि नामांतराची प्रकिया पुन्हा वेग घेत आहे. ज्यावेळी राज्यात जिल्ह्यांच्या विभाजनाचा निर्णय होईल, त्यात अहमदनगरला प्राधान्य असेल. सोबतच जिल्ह्याचे नामानंतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ असे केले जाईल. आता विभाजन आणि त्यासोबत नामांतरही व्हावे, अशी आमची अग्रही मागणी आहे. विखे पाटील जेव्हा विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा त्यांचा विभाजनाला पाठिंबा होता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदलू नये. या मुद्द्यावर आता नक्कीच सर्व सहमती होऊन नगरचं विभाजन आणि नामांतरही नक्कीच होईल, असे त्यांनी म्हटले होते.

नामांतर आणि जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर अशा घडामोडी घडत असताना आता जिल्ह्यात रथयात्रा निघत आहे. जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात यावे या मागणीसाठी ही रथयात्रा निघत आहे.ही रथयात्रा जिल्हाभरात जाणार आहे. या माध्यमातून नामांतराबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच येथील लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याची पत्रेही घेण्यात येणार आहे. या रथयात्रेला भाजप नेतेही उपस्थित राहणार आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना मंत्री विखे यांनी अद्याप काही वक्तव्य केलेले नाही. जिल्ह्याचे नामांतराला त्यांचा विरोध का आहे याचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. असे असले तरी या सध्याच्या राजकारणात त्यांची कोंडी होताना दिसत आहे. राज्य सरकार, भाजप नेते नामांतराला अनुकूल आहेत. मात्र विखे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विखे यांच्यावर दबावाचे राजकारण करण्याची एक संधी आ. शिंदे यांना या माध्यमातून मिळाली आहे. तसेही जिल्ह्यातील निष्ठावान भाजप नेत्यांचे विखे यांच्याबरोबर फार सख्य आहे अशातलाही भाग नाही. हे अनेकदा दिसून आले आहे. यानंतर आता मंत्री विखे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रस्थापितांना आव्हान

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे कुटुंबियांनी एकप्रकारे भाजप ताब्यात घेतल्याचे चित्र आहे, त्यामुळेच भाजप आमदार राम शिंदे यांनी हा मुद्दा पुढे आणल्याचे बोलले जात आहे. आधी गोपीचंद पडळकरांनी नगरच्या नामांतराचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला, यानंतर राम शिंदे यांनी नगरच्या विभाजनाची मागणी केली, त्यामुळे हा फक्त योगायोग समजायचा का? या मुद्द्यांमुळे विखेंची राजकीय कोंडी होणार का? या प्रश्नाचे उत्तर पुढील राजकीय घडामोडीत दडले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube