खारघर दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र

खारघर दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र

Ambadas Danve On Kharghar incidents : विधानपरिषदेचे (Legislative Council)विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve)यांनी महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)कार्यक्रमाची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अंबादास दानवेंनी आपल्या पत्रात म्हटलंय की, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari)यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम दि. 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईतील (Navi Mumbai)खारघर (Kharghar)येथील सेंट्रल पार्क मैदानावर झाला. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने 13 कोटी रुपये खर्च करुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रमात शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळे व ढिसाळ कारभारामुळे 14 निष्पाप श्री सदस्यांचा उष्माघातामुळे बळी गेल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे.

‘मविआ’तील कोंडी कायम? एकाही ‘वज्रमूठ’ सभेला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत

राज्यातील मागील काही दिवसांत तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस होते. तसेच 16 एप्रिलला नवी मुंबई येथील कार्यक्रमाच्या वेळी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास जाण्यासारखी परिस्थिती असतांना शिवाय कार्यक्रम स्थळ समुद्राजवळील दमट हवामानाच्या परिसरात असताना उष्ण व दमट हवामानाचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत माहिती संबंधित विभागाच्या सचिवांना माहिती नसेल, असे मानणे भाबडे पणाचे ठरेल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने खरोखरच तसा विचार केला नसेल तर मग त्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, असाही टोला दानवेंनी लगावला आहे.

सर्व परिस्थिती विचारात न घेता लाखो लोकांचा मेळावा भरदुपारी आणि तोही उघड्यावरच घेणे म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळणे आहे, अशी स्पष्ट भूमिका या अधिकाऱ्यांनी आणि मंत्री महोदयांनी घेतली आहे. मेळावा घ्यायचा झालाच तर मंडप घालून पंखे, पिण्याचे पाणी व आदी सुविधांचा वापर करावा लागेल, अशी भूमिका घेणे ही त्यांची जबाबदारी होती. त्याचप्रमाणे राजकीय नेतृत्वाने ही या गोष्टींचा सारासार विचार न करणे ही एक आश्चर्याचीच बाब आहे.

सामान्य जनतेचा सर्वसाधारण व अत्यावश्यक गरजांचा साधा विचार न करता त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरीपणा प्रशासन व राजकीय नेत्यांनी केला आहे. वास्तविक ज्या कार्यक्रमास अत्युच्च पातळीवरील नेतृत्व उपस्थित असते तेथील व्यवस्था काटेकोरच असणे अपेक्षित असून तरीही चेंगराचेंगरी झाली असेल तर त्यास प्रशासन व राजकीय नेतृत्वच जबाबदार आहे. त्यामुळे ही दुर्देवी घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. तसेच या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहिले नसल्याने सदरहू घटना घडली असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी घटनेमुळे सरळ सरळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा होत आहे, असंही आपल्या पत्रात म्हटलं आहे.

खारघरची घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी, याप्रकरणी आपण उच्चस्तरीत चौकशी करण्याबाबत व संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याचे शासनास निर्देश देण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube