Anil Bonde : सामान्य लोकांसाठी बजेट पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे
Anil Bonde On Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशी टीका भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची आज सुरुवात होत आहे. त्यावेळी ते दिल्लीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना राज्य सरकारच्या बजेटवर बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, “राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थेमध्ये अजित नवले यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आहे.”
हेही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडुंना मोठा दिलासा; ‘त्या’ आंदोलनाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार
त्यावेळी नवले विसरले होते
किसान सभेच्या अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकवरून मोर्चा निघाला आहे. त्यावरही अनिल बोंडे यांनी टीका केली. ते म्हणाले की, “मागच्या वेळीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अजित नवले याच्या नेतृत्वात नाशिकहून मोर्चा निघाला होता. त्यावेळी त्यांनी समोर येऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले होते. आताही अजित नवले पुन्हा मोर्चा घेऊन येत आहेत. मागच्या अडीच वर्षात ते मोर्चा काढायला विसरून गेले होते. आता ते पुन्हा मोर्चा काढत आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूची आहे.”
दरम्यान किसान सभेच्या अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथून शेतकरी मागण्यासाठी मोर्चा निघाला आहे. नाशिक ते मुंबई असा पायी लॉन्ग मार्च पूर्ण करणार आहेत. कांद्याला ६०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. कांदा निर्यातीच्या सर्व शक्यता पडताळून पाहून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा. किमान २०००/- रुपये दराने कांद्याची नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करा. शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज दिवसा सलग १२ तास उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा. शेतकऱ्यांचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा. अशा १२ मागण्यासाठी किसान सभेकडून मोर्चा सुरु आहे.