Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट

Baramati By Election बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, अर्ज मागे घेण्याचं कारणही सांगितलं..

  • Written By: Published:
Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट

How Congress Withdraw His Candidate From Baramati Assembly By Election : राजकारणात कधी कधी दोन पावलं मागे घेणं, हे भविष्यातील मोठ्या विजयाची नांदी असतं. बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने नेमकं हेच केलंय. पण ही माघार साधी नव्हती! यामागे शरद पवारांची चतुराई, रोहित पवारांची फिल्डिंग, सुप्रिया सुळेंची भावनिक साद आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ एक फोन कॉल… पाहूया बारामतीतील काँग्रेसच्या माघारी ही राजकीय स्क्रिप्ट नेमकी कशी लिहिली गेली.

या स्क्रिप्टची सुरुवात झाली शरद पवारांच्या एका विधानाने. पवारांनी चेंडू अत्यंत शिताफीने काँग्रेसच्या कोर्टात टाकला. ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघाताने रिक्त झालीये, त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा सल्ला आहे. पवारांना माहिती होतं की, आघाडीत फूट पडली तर, फायदा विरोधकांचा होईल. त्यांनी ‘राजकीय संस्कृती’ आणि ‘भावनिक साद’ यांचा वापर करून काँग्रेसची अशी कोंडी केली.

रोहित आणि सुप्रिया सुळेंची ‘डबल’ फिल्डिंग

एकीकडे मोठे पवार सल्ला देत होते, तर दुसरीकडे युवा नेते रोहित पवार ग्राऊंडवर आक्रमक होते. रोहित पवार ही जागा अजित पवार गटाकडेच राहावी यासाठी त्यांनी स्थानिक नेत्यांशी संवाद साधला त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. तर, सुप्रिया सुळे यांनी दिल्ली आणि मुंबईतील काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधला. “राजकारणापेक्षा नाती आणि परंपरा मोठी असते,” ही सुप्रिया सुळेंची भावनिक भूमिका काँग्रेसला माघारीसाठी प्रवृत्त करण्यात यशस्वी ठरली.

या संपूर्ण नाट्याचा ‘क्लायमॅक्स’ तेव्हा घडला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. राजकारणात जाहीर सभांपेक्षा ‘पडद्यामागचे फोन’ जास्त प्रभावी ठरतात, हे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुरुवातीला ही लढाई महाविकास आघाडीचा अंतर्गत वाद वाटत होती, पण फडणवीसांनी यात अतिशय संयमी प्रवेश केला. जेव्हा शरद पवारांनी ‘बिनविरोध’ निवडणुकीचा राग आळवला, तेव्हा फडणवीसांनी ही केवळ चर्चा न ठेवता ती कृतीत आणण्यासाठी पावले उचलली या स्क्रिप्टमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला तो फडणवीसांनी केलेला एक फोन.

फडणवीसांनी अर्ज माघारीला काही तास शिल्लक असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन लावला. यावेळी फडणवीसांनी सपकाळ यांना स्पष्ट सांगितलं की, “महाराष्ट्राची राजकीय परंपरा पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली. सपकाळ यांना फोन करून फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे पवार कुटुंबाशी राजकीय संघर्ष असूनही ‘संस्कृत राजकारणी’ म्हणून फडणवीसांनी स्वतःची प्रतिमा उंचावली आणि दुसरं म्हणजे महायुतीमधील संभाव्य बंडाळीही रोखली.

थोडक्यात सांगायचं तर, बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या माघारीची स्क्रिप्ट शरद पवारांनी सुरू केली तरी, तिचा ‘क्लायमॅक्स’ देवेंद्र फडणवीसांनी लिहिला. सपकाळ यांना केलेला तो फोन आणि दिलेला शब्द हीच या निवडणुकीतील खरी ‘पडद्यामागची गोष्ट’ ठरली. मात्र, या माघारीमागे एक अदृश्य डील असल्याचीही चर्चा आहे. बारामती सोडली, तर भविष्यात विधानसभेला किंवा इतर जागावाटपात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिक जागांची मागणी करू शकते. त्यासाठी आज आम्ही ऐकलं, उद्या तुम्ही आमचं ऐका,” अशी भूमिका काँग्रेस घेऊ शकते.

follow us