Kasba By Election : …तर भाजप हेमंत रासने यांची उमेदवारी मागे घेणार

Kasba By Election : …तर भाजप हेमंत रासने यांची उमेदवारी मागे घेणार

पुणे : टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी निवडणूक लढणार नाही, असं असेल तर आम्ही टिळक कुटुंबियांनी उमेदवारी देण्यासाठी तयार असल्याचं मोठं विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) केलंय. तसेच हेमंत रासने यांनी दिलेली उमेदवारी आम्ही मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बावनकुळे यांनी नूकतीच दिवंगत आमदार मुक्ता टिळक(Mukta tilak) कुटुंबियांची भेट घेतलीय. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, पुण्यातल्या पिंपरी आणि कसबा या दोन्ही मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक निवडणुकीत आम्ही उमेदवाराचं मेरिट तपासून उमेदवारी देत असतो. आमच्यासाठी सर्वच कार्यकर्ते चांगले आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की, तुम्ही म्हणत असाल की, टिळकांना उमेदवारी दिल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, तर आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला देत बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या एका फोनवर आम्ही आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अंधेरी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतरच अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती.

कसबा निवडणुकीत असं झालं तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले यांचे आभार मानणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. उद्या ३ वाजेपर्यंत सांगा आम्ही ताबडतोब रासनेंच्या अर्ज माघारी घेत टिळक कुटुंबियांनी उमेदवारी देऊ, असंही ते म्हणाले आहेत.

कसबा निवडणुकीत महाविकास जी काही भूमिका घेईल ती आम्हांला मान्य असून जर निवडणूक नाही झाली तर भाजपचा उमेदवारच निवडून येईल आणि झाली तरीही भाजपचाच उमेदवार 51 टक्के निवडून येणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

आम्ही ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षासह कोणत्याही समाजाचे लोकं नाराज नसल्याचंही ते म्हणालेत. तसेच काही लोकं पडद्यामागे बोलतात की टिळक कुटुंबिय नाराज आहेत, त्यांची नावे आम्ही योग्य वेळ आल्यानंतर सांगणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

दरम्यान, आमचा एखाद्या निर्णयाने निवडणूक होणार नसेल आम्ही देऊ टिळकांना उमेदवारी देणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय, या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडीकडून काय भूमिका घेतली जातेयं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube