भाजपने पत्ते उघडले! विधानपरिषदेसाठी तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 10 04 At 2.43.31 PM

BJP announces three candidates for Legislative Council elections : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. काँग्रेसनांतर भाजपने देखील आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक या तीन मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपने संधी दिली आहे.

नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळे मैदानात

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पेशाने शिक्षक असलेले सुधाकर कोहळे नागपूरच्या राजकारणातील परिचित नाव आहे. ते नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या चिन्हावर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. महापालिकेत त्यांनी पाणीपुरवठा सभापती म्हणून देखील काम पाहिले आहे. 2014 मध्ये पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. मात्र 2019 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. तरी देखील त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली.

2024 मध्ये भाजपने त्यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे नोंदणीप्रमुख आणि निवडणुकीची जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर झालेल्या भेटीनंतर सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात आता भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

Garjana Morcha : ‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अनिल देशमुखांची डायलॉगबाजी

पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. जाधव यांनी पीएच.डी. इन एज्युकेशन, एमबीए फायनान्शियल मॅनेजमेंट आणि बीई कॉम्प्युटर्सपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून शिक्षणतज्ज्ञ, महिला सक्षमीकरण आणि उद्योग क्षेत्रातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव आहेत. तसेच पुढारी पब्लिकेशनच्या संचालक, टोमॅटो 94.3 एफएम आणि आपलं एफएम 91.9च्या कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी 18 हजारांहून अधिक महिलांचे नेटवर्क उभारले असून महिलांना सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार, भारत सन्मान निधी पुरस्कार, ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड, एज्युप्रन्योर ऑफ द इयर, बेस्ट सीईओ, आऊटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन आणि प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे

पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. एम.कॉम आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेले कौस्तुभ गावडे हे कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करताना शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक आणि शैक्षणिक प्रशासनातील विविध घटकांशी त्यांचा सातत्याने जवळून संपर्क राहिला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा

23 ऑक्टोबरला मतदान, 27 ऑक्टोबरला निकाल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून 9 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. भाजपने तीन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता या निवडणुकीतील राजकीय चुरस आणखी वाढली असून, पुणे आणि नागपूरमधील लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.

follow us