स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, पण शहरात कचऱ्याचे ढीग! राहुल कलाटेंनी प्रशासनाला धरले धारेवर; आंदोलनाचा इशारा

Rahul Kalate PCMC : स्वच्छतेचा पुरस्कार मिळूनही शहरातील कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न कायम असल्याने राहुल कलाटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 20T212500.507

Rahul Kalate PCMC : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला (Pimpri Chinchwad) स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाल्यानंतरही शहरातील कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचत असून, नव्याने निर्माण केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना अद्याप आवश्यक वाहने, कर्मचारी आणि यंत्रसामग्री मिळालेली नाही. या परिस्थितीवरून नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वच्छता आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानाच प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचे आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पही अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. या प्रकल्पाशी संबंधित भागातील नगरसेवकांना आंदोलन करावे लागत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याची परिस्थिती बिकट असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप कलाटे यांनी केला. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेण्याऐवजी शहरातील प्रत्यक्ष परिस्थितीची जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांनी सुनावले.

नवीन क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने, कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आपण स्वतः महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे कलाटे यांनी सभागृहात सांगितले. संपूर्ण शहराचा विचार करून कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वीकृतसाठी भाजपची सात नावे जाहीर, राष्ट्रवादीकडून तिघांना संधी; निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा

दरम्यान, स्वच्छता आणि आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि बोनसचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र, अशा कर्मचाऱ्यांनाच दिवाळीत वेतन आणि बोनस मिळाला नसल्याची बाब दुर्दैवी असल्याचे कलाटे म्हणाले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाने त्यांच्याबाबत सहानुभूतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नवीन क्षेत्रीय कार्यालयांना केवळ प्रशासकीय स्वरूप देऊन उपयोग नाही, तर त्यांना प्रत्यक्ष काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निधीचाही प्रश्न गंभीर असून, या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. स्वच्छतेचा प्रश्न हा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाने नवीन क्षेत्रीय कार्यालयांच्या अडचणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या प्रलंबित वेतन आणि बोनसचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्हालाही आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा कलाटे यांनी दिला.

follow us