फडणवीस तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला; धाराशिव लोकसभा जागेवर थेट बोलले
Devendra Fadanvis On Dharashiv Loksabha : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवनीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर आदी नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाज देवीच्या दर्शनासाठी आलो असे ते म्हणाले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेणे ही अत्यंत महत्वपूर्ण घटना असते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच याठिकाणी दर्शनासाठी आलो. आई ही शक्तीची देवी आहे. आम्ही आई तुळजाभवानीला शक्ती मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जे सरकार स्थापन केले त्यामाध्यमातून जनतेची काम व्हावी यासाठी देवीकडे शक्ती मागितली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आईचे उपासक आहे. त्यांना देखील देश पुढे नेण्यासाठी आईने शक्ती द्यावी, अशी आम्ही प्रार्थना केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?
देशाचं नेतृत्व करणार का?
याआधी मंदिरात पुजाऱ्यांनी फडणवीस यांनी देशाचं नेतृत्व करावं, अशी प्रार्थना केली. त्यावर देखील फडणवीस बोलले. लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात. पण मी ज्या जागी आहे त्याजागी पूर्ण समाधानी आहे. महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्वाची घटना आहे. आज देशामध्ये एक सक्षम नेतृत्व आहे की, पुढचे 20 वर्ष त्यांनीच नेतृत्व करावं, असे फडणवीस म्हणाले.
🕞3.32pm | 16-06-2023 📍Tuljapur (Dharashiv) | दु. ३.३२ वा. | १६-०६-२०२३📍 तुळजापूर (धाराशिव)
LIVE | Media interaction https://t.co/3lB5rNt4lT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2023
धाराशिव लोकसभा कोण लढणार?
भारतीय जनता पक्षामध्ये संसदीय बोर्ड आहे. आमचं केंद्रीय नेतृत्व आहे. ते याबाबत निर्णय घेतात. शिंदे साहेब आणि मी एकत्रित बसू. त्यानंतर जर काही अडचण असेल तर त्या सोडवू. सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं की, आपण ही जागा लढावी, त्यात गैर काही नाही. पण वस्तुस्थिती जी असेल त्यावरुन आम्ही निर्णय घेऊ, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धाराशिव लोकसभा जागेवरुन शिवसेना व भाजपमध्ये वाद सुरु आहे. ही जागा आधीपासून शिवसेनेकडे आहे. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटात असून भाजप आमदार राणा पाटील यांनी 2024 साली धाराशिवला भाजप खासदार निवडून येणार असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी आम्हाला ग्रँटेड धरु नये, असे म्हणत भाजपला ठणकावले होते.