बिश्नोई गँगकडून मला संपवण्याचा रचला डाव; भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

Suresh Dhas on Satish Bhosale Khokya : भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा थेट दावा त्यांनी केला आहे. (Dhas ) सतीश भोसले हरणांना मारुन त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो, असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं. या लोकांना मला मारण्यासाठी आणलं होतं, असं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्टाचं राजकारण तापवलं होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंसह भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही टीकेची तोफ डागली होती. पण तेच सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले होते. याच ‘खोक्या’वरुन आता सुरेश धसांनी आता पुन्हा एकदा बाजी पलटवताना गंभीर आरोप केला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीटं काडून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं थेट मुंबईत आणण्यात आली. त्यांना खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटनं अमानुष मारहाण, उधळलेल्या नोटा, हरणाच्या शिकारी यांवरुन होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देतानाच सर्वात मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.
सतीश भोसलेचं घर कोणत्या नियमाने पाडलं; खोक्याच्या कुटुंबाला भेटत सुरेश धसांचा वनविभागाला सवाल
खोक्या जो वाळू कॉन्ट्रक्टर आहे, वनविभागाच्या जागेत राहत होता, बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. तसंच, मुथुट फायनान्समधून आणलेले पैसे उधळत होता. त्याची 4 ते 5 लाखांचीही प्रॉपर्टी नसेल, हाच तो खोक्या जो टीव्हीवर दाखवण्यात आला. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेलं. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का? अशी मिश्किल टिप्पणीही आमदार धस यांनी यावेळी केली.
परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले, सुरेश धसला खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं. माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का? माझ्या आयुष्यात 16 वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो. पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. मी पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं? असं म्हणत धस यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला.
माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसऱ्याने मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची चार दोन माणसं आणायची. बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं. तो लॉरेन्स बिश्नोई. त्यांच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की, सुरेश धस हरणाचं मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असंही त्यांनी आरोप विरोधकांवर केला. म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामायची.
हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगणार आहोत. इतक्या दिवस आपण हे कधी बोललो नव्हतो. बिश्नोई समाजाची तीन-चार लोकं विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणात असाल, आणि त्यांना जर खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले ना. यापाठीमागं कोण कोण लोकं आहेत हे मला माहीत असल्याचंही धस यावेळी म्हणाले. शिरुर कासारमध्ये बाहेरुन लोकं आणून मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चाही अगदी 250 लोकांचा होता. या दोनशे अडीचशेच्या मोर्चानं काय होणार? काही झालं की शिरुर बंद काहीही झालं की शिरुर बंद. ते जे शिरुरमध्ये राहणारे लोकं पळून चाललेत ना, असा टोलाही सुरेश धस यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय.