राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांची भूमिका बदलली?

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांची भूमिका बदलली?

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आज बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आज ते पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की राज ठाकरे यांची मी सैध्दांतिक मुद्द्यावरुन विरोध केला होता. राज ठाकरे यांच्याशी माझा वैयक्तिक वाद वाद नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कधीच वाद नव्हता. दोन्ही राज्यांमध्ये आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात आपली उपजिवीका भागवतात, त्यामुळं महाराष्ट्राला माझा विरोध नव्हताच असंही सांगितलं.

बृजभूषण म्हणाले की, महाराष्ट्रात 2008 ते 2011 पर्यंत अनेक आंदोलनं झाली. त्यामध्ये उत्तरेतील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यातील लोकांना मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून आम्ही राज ठाकरे यांना विरोध केला होता. त्यापेक्षा यामध्ये वेगळं काहीच नव्हतं. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की, आपण तेव्हाही म्हणालो होतो की, राज ठाकरे यांच्या नावाचा काहीजण दुरुपयोग करताहेत. याबद्दल कदाचित खुद्द राज ठाकरे यांनाही माहीत नसावी. राज ठाकरे आणि माझी काही राजकीय स्पर्धा नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि मी उत्तरप्रदेशमध्ये राहतो. त्यामुळं त्यांची आणि माझी राजकीय स्पर्धा असण्याचं काहीच कारण येत नाही.

पत्रकारांनी बृजभूषण यांना विचारलं की, राज ठाकरे पुन्हा अयोध्येला आल्यास त्यांचं स्वागत करणार का? त्यावर बृजभूषण म्हणाले की, आजतरी मी कुस्तीसाठी आलो आहे. आज अयोध्या आणि राज ठाकरेंचं प्रकरण सुरु नाही. आज मी कुस्तीच्या प्रचारासाठी आलो आहे. कुस्ती आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे.

त्याचवेळी महाराष्ट्रातील कुस्तीच्या वादाबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, भारतीय कुस्ती संघाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. त्याचा मी अध्यक्ष आहे. माझं मत आहे की, खेळात राजकारण न करता खेळात प्रगती करता येईल असा आपला दृष्टीकोन ठेवावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube