कल्याणमध्ये भीषण हिट अँड रन, 17 वर्षीय मुलाच्या भरधाव कारच्या धडकेत व्यावसायिकाचा मृत्यू

हिट अँड रन प्रकरणातील कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप असून, अपघातानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

  • Written By: Published:
Untitled Design 95

Businessman dies after being hit by a speeding car driven by a 17-year-old boy : कल्याणमध्ये रिंग रोडच्या अपूर्ण भागावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 42 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. वेगात येणाऱ्या कारणे त्यांना जोरदार धडक दिल्याने ते काही क्षण हवेत फेकले गेले. ही कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप असून, अपघातानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ताब्यात घेतल आहे.

याप्रकरणी बेफिकीर आणि निष्काळजी व्हॅनचालकासह अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, कारच्या मालकीण असलेल्या आरोपीच्या आईला देखील आरोपी करण्यात आले आहे. मुलाने कार घेण्यापूर्वी आईला सांगितल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. आरोपी मुलाचे वडील वकील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मुलाने सोशल मीडियावर छोटा अपघात झाला अशी पोस्ट केली होती आणि वडिलांकडून ओरडा खावा लागेल, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली.

मृत व्यक्तीचे नाव श्रीनिवास तांडेल असून, त्यांची कल्याणमध्ये अनेक कपड्याची दुकानं आहेत. त्यांच्या भावाने सांगितले की, फिट राहण्यासाठी त्यांनी नुकतीच सायकलिंग सुरू केली होती आणि अपघाताच्या दिवशीच ते पहिल्यांदा सायकल चालवत होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मंगळवारी संध्याकाळी सुमारे 8 वाजता तांटेल सायकल चालवत असताना भरधाव कारने अचानक वळण घेत त्यांना धडक दिली आणि चालक पळून गेला. स्थानिकांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित कार शोधून काढली, ती आरोपीच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी आढळली. वाहनावर किरकोळ नुकसान झाले होते. मृताच्या भावाने, गणेश तांडेल यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालक बेफिकीरपणा कार चळवळ असल्याचं दिसत असल्याचा आरोप केला. कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कुटुंबातील मित्र विमल ठक्कर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला रिंग रोडचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवण्याचे आवाहन केले.

स्थानिक नागरिकांनी देखील या मागणीला पाठिंबा देत रस्त्यावर स्पीड ब्रेकर, अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या अपूर्ण रस्त्यावर वाहनचालकांकडून वेगाने गाडी चालवणे आणि स्टंटबाजी करणे वारंवार घडत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. दरम्यान, हा रिंग रोड प्रकल्प MMRDA कडून टप्प्याटप्प्याने विकसित केला जात आहे. बारावे ते वडवली पुलाजवळील भागातील काम जमीन अधिग्रहणाच्या अडचणींमुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग अपूर्ण असून, स्थानिक नागरिक चालणे व सायकलिंगसाठी त्याचा वापर करतात.

Tags

follow us