Chandrashekhar Bawankule : शरद पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील, ते बघून घ्यावेत
“शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये.” असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. सरकार बदलण्याचा देशाचा मुड असल्याचं ते म्हणाले. शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पोटनिवडणुकीवर शरद पवारांनी भाष्य केलं. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकांत यश मिळाल्याचा दावा करत भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे. मात्र, शरद पवार यांनी देशभरात बदलाचे वारे आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला. यावर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा : Sharad Pawar : ‘सरकार बदलण्याचा देशाचा मुड’; शरद पवारांचं मोठं विधान
पवारांनी निकाल बघून घ्यावेत
यावेळी बावनकुळे यांनी तीन राज्यातील भाजपच्या विजयावरून देखील टोला लगावला आहे, ते म्हणाले की “मला वाटतं शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले.”
आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकली
शरद पवार यांच्या या विधानावर बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे, ते म्हणाले की “चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकलीये. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू.”