अहिल्यानगरच्या प्रसिद्ध भंडारदरा धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळं बंद
Cloudburst-like rainfall in Bhandardara घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे.
Cloudburst-like rainfall in famous Bhandardara Dam area of Ahilyanagar major tourist spots closed : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासांत जोरदार पावसाची नोंद झाली असून, 300 मिलिमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे. घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे.
दुर्गम भागातील परिस्थिती गंभीर
सततच्या मुसळधार पावसामुळे घाटघर, रतनवाडी आणि आसपासच्या आदिवासी भागांतील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पर्यटनस्थळांवर बंदी
पावसाचा वाढता जोर आणि पूरस्थिती लक्षात घेऊन भंडारदरा परिसरातील संवेदनशील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. कळसूबाई शिखर, सांदण व्हॅली, रतनवाडी परिसर तसेच येथील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, धोकादायक ठरू शकणाऱ्या धबधब्यांच्या परिसरात जाण्यासही प्रशासनाने बंदी घातली असून नागरिक आणि पर्यटकांनी सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.