Political News : शिंदे – फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता
शिंदे -फडणवीस सरकारमधील 20 मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त देखील अद्याप हुकले आहे. त्यामुळे आता आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
खरी शिवसेना कोणाची यावरून सुरु असलेला वाद अद्यापही सुरूच आहे. शिवसेना हे पक्षाच नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? या प्रकरणावर अंतिम निर्णय प्रलंबितच आहे. सुप्रीम कोर्टामध्येही याबाबतची सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे याबाबतही आज शहांच्या उपस्थितीत चर्चा होण्याची शक्यता आहे.