P. N. Patil : कोल्हापूरवर शोककळा; काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

P. N. Patil : कोल्हापूरवर शोककळा; काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : करवीरचे काँग्रेसचे आमदार पांडुरंग निवृत्ती ऊर्फ पी. एन. पाटील (P. N. Patil) यांचे आज (23 मे) पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.  रविवारी (19 मे) राहत्या घरी पाय घसरुन पडल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ ‘सडोली खालसा’ या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आमदार पाटील रविवारी राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अ‍ॅस्टर आधार  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्त्राव होऊन गाठ तयार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील 72 तासांचा कालावधी काळजी करण्यासारखा असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते.

शस्त्रक्रियेनंतर त्यांची सिटी स्कॅन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल चांगला आला होता. मात्र पुन्हा त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव सुरु झाला होता.  त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर व्हेंटिलेटरद्वारे उपचार सुरु केले होते. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत कोल्हापूर काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अतीव दुःख व्यक्त केले.

शाहू महाराजांच्या प्रचारात मतदारसंघ पिंजून काढला…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात पाटील सक्रिय होते. त्यांनी शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. मात्र त्यांना मतदानाच्या काही दिवसापूर्वी थकवा जाणवत असल्याने ते घरी आराम करत होतो. त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. यामुळे त्यांना शनिवारी रात्री घरीच सलाईनही लावण्यात आली होती. कार्यकर्ता जपणारा माणूस म्हणून आमदार पी. एन. पाटील यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख होती तसेच त्यांचे सर्व पक्षांसोबत घनिष्ठ संबंध होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या