काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा 18 फेब्रुवारीला होणार पदग्रहण सोहळा

Harshvardhan Sapkal : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी 1 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
पदग्रहण सोहळ्याची तयारी झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे. नाना पटोले यांनी चार वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात काॅंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नाना पटोले यांनी काॅंग्रेस हायकंमाडकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यात काॅंग्रेसची कमान देण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ मुळचे बुलढाण्याचे आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून 2014 ते 2019 या काळात आमदार होते. पण 2019 मध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. 1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता. सध्या हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पण गत दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य राहिले आहेत.
सोनम कपूरला ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ पाहण्याची आतुरता, युकेमध्ये होणार ग्रँड प्रीमियर!
यापूर्वी त्यांनी युवक कॉंग्रेस व एन.एस.यू.आय. या युवकांच्या संबंधित दोन संघटनांचे प्रभारी म्हणूनसुद्धा कार्य केलेले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव व अभ्यास लक्षात घेत त्यांच्यावर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.