नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याचं नाव फायनल?
Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यासाठी पक्षनेतृत्वासमोर काही नेत्यांची नावं आहेत. मात्र त्याआधी एक मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्याही नावाची जोरदार चर्चा होत आहे.
लोकसभेत यश मिळाल्यानंतर काँग्रेसला विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी दुसऱ्या नेत्याचा शोध सुरू होता. शैक्षणिक संस्था व साखर कारखानदार नेत्याकडे ही जबाबदारी द्यावी याबाबत चर्चा झाली. त्यातून सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, संग्राम थोपटे अशा नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. पण हे नेते थेटपणे भाजपच्या विरोधात जायला कचरत होते. पुढे येण्यासाठी कुणी फारशी उत्सुकता दाखवत नव्हते.
त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचेही नाव चर्चेत होते. पण या नेत्यांनीही उत्सुकता दाखविली नाही. अखेर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री नितीन राऊत यांची नावे पुढे आली होती. परंतु, ही नावेही आता मागे पडली असून नवे नाव चर्चेत आले आहे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची दाट शक्यता आहे. सपकाळ हे सचिन राव आणि मिनाक्षी नटराजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2014 ते 2019 या काळात त्यांनी जलवर्धन हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवला आहे.
इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 237 जागा जिंकले होते तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला होता. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 132, शिवसेना 57, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळावला होता. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) 20, काँग्रेसने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकले होते.