इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार?
![इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार? इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/09/India-Alliance_V_jpg--1280x720-4g.webp)
Congress INDIA Alliance : इंडिया आघडीत असतानाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (AAP) स्वतंत्र लढले. याचा परिणाम म्हणून आम आदमी पार्टीचे काही उमेदवार पराभूत झाले असा दावा केला जात आहे. आघाडीतील अन्य (INDIA Alliance) पक्षाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस (Congress Party) इंडिया आघाडीच्या बाबतीत कोणत्याही घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
दिल्लीनंतर आता बिहारमध्ये निवडणुका (Bihar Elections 2025) होणार आहेत. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असा अंदाज आहे. येथे राजद (RJD) आघाडीत आहे. आसाममध्ये सुद्धा काँग्रेसने लहान पक्षांशी आघाडी केलेली आहे. तसेच योग्य वेळ आल्यानंतर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पार्टीबरोबर आघाडी करण्यासही काँग्रेस तयार आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीची एखादी बैठक घ्यावी याची काँग्रेसला गरज वाटत नाही.
काँग्रेसला धक्का! पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार; ममता बॅनर्जींनी घोषणाच केली
गोवा, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत आम आदमी पार्टीने फक्त काँग्रेसचे नुकसान केले. यानंतर दिल्लीतील निवडणुकीत (Delhi Elections) दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. यात आम आदमी पार्टीला मोठे नुकसान झाले. सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आता या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले जाऊ नये यासाठी सध्या फक्त मुद्द्यांवर चर्चा करून संसदेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सामंजस्य बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांनी (Kapil Sibbal) सांगितले की काँग्रेस नेहमीच सर्वांना सहमतीने सोबत आणण्याचा प्रयत्न करत असतो. इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीने लढल्या पाहिजेत यावर निर्णय घ्यायला हवा. सर्वच पक्षांनी संभ्रम दूर केला पाहिजे. अरविंद केजरीवाल यांनाही (Arvind Kejriwal) प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्यावेळी त्यांनी गोवा, हरियाणा, गुजरात आणि अन्य ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले होते.
जेव्हा बिहारमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेसची कामगिरी खराब राहिली होती. त्यावेळी राजदने आम्ही काँग्रेसमुळे सत्तेत येऊ शकलो नाही असे स्पष्ट सांगितले होते. आता या गोष्टी बाजूला ठेवून आगामी निवडणुका कशा लढल्या पाहिजेत यावर सर्व पक्षांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. भाजपकडे एकच कमान आहे आणि याचा त्याला फायदा देखील मिळतो. उत्तर प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पार्टीबरोबर (Samajwadi Party) आघाडी करत निवडणुका लढल्या. तामिळनाडूतही असेच झाले. या गोष्टींचा विचार करून आपसांत चर्चा झाली पाहिजे त्यानुसार वाटचाल केली पाहिजे असे कपिल सिब्बल म्हणाले. आता त्यांच्या या आवाहनाला इंडिया आघाडीतील घटक पक्ष कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत..डिपॉझिट जप्त कधी होते?