INDIA आघाडीत उद्धव ठाकरेंना शक्तिप्रदर्शनाची संधी… पण शरद पवारांमुळे मिळेना मुहूर्त!
मुंबई : पाटना आणि बंगळूरुनंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. काही पक्षांकडून 25 आणि 26 ऑगस्ट या तारखांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्यस्त दौऱ्यांमुळे या तारखेवर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीची आगामी बैठक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NCP President Sharad Pawar’s busy tours, the date of the third meeting of the India Aghadi has not been fixed)
शरद पवारांचा व्यस्त दौरा :
शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांविरोधात मोर्चा उघडला आहे. बंडखोरांच्या विरोधात पर्यायी नेतृत्व देणं आणि त्या नेतृत्वाला ताकद देणं, पक्षाची पुनर्बांधणी करणं यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच दौऱ्यामुळे पवार यांची तारीख अद्याप मिळालेली नाही.
मुंबई बैठकीची सुत्रं उद्धव ठाकरेंच्या हाती :
मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या आयोजनाची आणि नियोजनाची सगळी सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मुंबईत राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. अशात अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत गोंधळाची परिस्थिती आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची ताकद आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट केले जात आहे. त्यामुळे या बैठकीची सुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली असल्याची माहिती आहे. या निमित्ताने देशभरातील 26 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करण्याची उद्धव ठाकरे यांना संधी असणार आहे.
इंडिया आघाडीतील मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की 25-26 ऑगस्ट ही तारीख अद्याप विचाराधीन आहे, परंतु सर्व नेत्यांच्या उपस्थिती असावी यासाठी आम्ही एक समान तारीख शोधण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. दरम्यान, शुक्रवारी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऑगस्टमध्ये सभांची योजना आखली आहे. पावसाळ्यामुळे या सभांना विलंब होत आहे.