पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले.

लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या २४ तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात की, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि नंतर दुसऱ्याच दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो, याचा काय संबंध लावायचा, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

एसआयटी गठीत करण्याचे आदेश :

पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत SIT गठीत करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला सोमवारी दि.6 रोजी रात्री भरधाव गाडीने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी सोमवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात बातमी दिल्याने वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला. बुधवारी पोलिसांनी गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

राऊत यांचे फडणवीसांना पत्र :

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी एक पत्र लिहिले आहे. नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. यासंदर्भात शशिकांत वारिसे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या भागातील काही राजकारण्यांच्या डोळ्यात ते खुपत होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube