महाराष्ट्रात शाळांची घंटा वाजताच प्रत्येक शाळेला लावावी लागणार 50 झाडे; आदेश निघाले

Tree Plantation नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आता शिक्षणासोबतच पर्यावरणाची धुराही असणार आहे.

  • Written By: Published:
Tree Plantation In School

Tree Plantation In School : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आता शिक्षणासोबतच पर्यावरणाची धुराही असणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक पेड माँ के नाम 3.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, महाराष्ट्राला सन 2026-27 या वर्षासाठी तब्बल 53 लाख 1 हजार 257 झाडे लावण्याचे भव्य उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेला किमान 50 झाडे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बाबतचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘हवामान बदल’ आणि पर्यावरणीय संवेदनशीलता

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि संवेदनशीलता रुजवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 5 जून (पर्यावरण दिन) ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही वृक्षारोपण मोहीम शाळांमधील ‘इको क्लब’च्या माध्यमातून राबवली जाईल. केवळ झाडे लावणे नव्हे, तर लावलेल्या रोपांचे संवर्धन, त्यांची देखभाल आणि नियमित निरीक्षण करणे ही देखील विद्यार्थ्यांची जबाबदारी असणार आहे.

जागेची अडचण असल्यास पर्याय उपलब्ध

अनेक शाळांच्या आवारात वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसते, अशा शाळांसाठी शिक्षण विभागाने लवचिक धोरण अवलंबले आहे. जर शाळेच्या आवारात जागा नसेल, तर विद्यार्थ्यांनी घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक जागा किंवा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक समुदाय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून हे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

‘ग्रीन समर कॅम्प’द्वारे निसर्गाशी नाळ

वृक्षारोपणासोबतच निसर्ग आणि शिक्षण यांची सांगड घालण्यासाठी शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून 5 ते 30 जून या कालावधीत ‘ग्रीन समर कॅम्प’ आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात निरोगी जीवनशैलीचा अवलंब व शाश्वत अन्नप्रणाली,  ई-कचरा कमी करणे व ऊर्चाबचत, पाणीबचत व एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला प्रतिबंध अशा महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जाणार आहे.

नोंदणी कुठे करायची?

या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि वृक्षारोपणाची माहिती संकलित करण्यासाठी विशेष पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळांनी आपल्या उपक्रमांची आणि लावलेल्या झाडांची माहिती http://ecoclubs.education.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांनी केवळ संख्या पूर्ण न करता, लावलेली झाडे जगवण्यावर भर द्यावा, जेणेकरून भविष्यात एक समृद्ध हरित पट्टा निर्माण होईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

follow us