Video : शिंदेंची दूरदृष्टी अन् वेगवान प्रवास; विकासाची द्वारं खुली करणारा ‘समृद्धी महामार्ग’
कधीकाळी मुंबई ते नागपूर प्रवास करणे म्हणजे कंटाळवाणा प्रवास होता. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) येताच कंटाळवाणा वाटणारा मुंबई-नागपूर प्रवास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे एकदम सुखकर झाला आहे. तब्बल 701 किलोमीटर एवढं भलं मोठं अंतर असलेला महामार्ग अंतिम टप्प्यात असून, तो वेळेत पूर्णत्वास येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विशेष गती दिली आहे. हा महामार्ग राज्यासाठी विकासाचे नवी द्वारं खुले करणारा असून, विकसनशील आणि कार्यसम्राट मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे कर्तृत्त्व सिद्ध करणारा असून, भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून मार्ग काढण्यात शिंदेंचा मोलाचा वाटा आहे.
समृद्ध अन् विकसित ठाणे.. CM एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांचं मोठं यश
प्रवासासह विकासाला गती देणारा महामार्ग
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासांनी कमी होणार आहे. या महामार्गामुळे अनेक नव्या विकासांना चालना मिळण्याबरोबरच विकासाची नवनवीन द्वारंदेखील यामुळे खुली होण्यास मदत झाली आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किमीचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तर, अवघ्या देशाचं आराध्य दैवत असलेल्या शिर्डी ते इगतपुरीदरम्यान अतिरिक्त 80 किमीचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये खुला करण्यात आलाय यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचण्याबरोबरच प्रवासही सुखकर होण्यास मदत झाली असून, इगतपुरी ते मुंबई या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यांतून जात असून, अप्रत्यक्षपणे 14 जिल्ह्यांना जोडणारा आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढण्यास फायदा होणार आहे. याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांना जोडणारी असल्याने हा एक आर्थिक कॉरिडॉर म्हणूनही उदयास येणार आहे.
अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणजे समृद्धी महामार्ग
मुंबई ते नागपूर असा विकसित करण्यात येणारा समृद्धी महामार्ग केवळ महामार्गच नसून, अभियांत्रिकीचा चमत्कार असलेला महामार्ग आहे. या महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधण्यात आले असून, यात कसारा घाटातील 7.7 किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे. हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गावरील बोगद्यांपैकी एक आहे. एवढेच नव्हे तर, हा महामार्ग तीन वन्यजीव अभयारण्यांसह, 35 इको-सेन्सिटिव्ह झोन आणि 310-मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो.
महायुतीचा टॉप गिअर! मविआला पछाडत रचला विकासकामांचा डोंगर..
शिक्षण, आरोग्य सुविधा असलेल्या 18 टाऊनशिप
या महामार्गाचा विकास पारंपारिक महामार्गांप्रमाणेच करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये महामार्गावर 30-40 किमी अंतराने शैक्षणिक, आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाऊनशिपचा समावेश असून, यामुळे ग्रामीण-शहरी असमानता कमी होण्यास मदत झाली आहे.
अतिरिक्त मार्गांनी समृद्धीला येणार वेग
समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्गदेखील तयार केले जात असून, यामध्ये प्रामुख्याने 53 किमीचा पुणे-शिरूर रोड आणि 180 किमीचा जालना-नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जालना-नांदेड मार्गाने भविष्यातील हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जेएनपीटीला थेटल जोडले जाणार असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 9,565 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच काय तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली असून, विस्तृत पायाभूत सुविधांमुळे हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणारा ठरणार आहे.