“धनशक्तीचे ब्रह्मास्त्र ‘महाशक्ती’ने वापरूनही भ्रमाचा भोपळा फुटलाच!” सामन्यातून कसबा निकालावर विश्लेषण
“पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच! राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली.” असं विश्लेषण सामना मध्ये आजच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसने काल जिंकला त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली.
मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले
कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे, हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले. एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले.
आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे. कसब्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे. कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही २०२४ पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील!
मुस्काट फोडणारे परिवर्तन
कसब्यासाठी अख्ख मंत्रिमंडळ प्रचारात उतलं. अमित शाह सुद्धा पुण्यात येऊन गेले. धनशक्तीचे ब्रह्मास्त्र महाशक्तीने वापरून पाहिले. पण तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्या गद्दारीचे मुस्काट फोडणारे परिवर्तन कसब्यात झाले. ही तर विजयाची ठिणगी आहे. आता वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
तोंडावर मारलेला तमाचाच
कसब्याचा निकाल म्हणजे लोकशाहीचे हत्याकांड घडवून गद्दारांच्या खोकेशाहीला राजवस्त्रे देणाऱ्या हुकूमशहा आणि ठोकशहांच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचाच आहे. महाराष्ट्रासह देशातही किती असंतोष खदखदत आहे हे यातून दिसून आलं आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.