Viral Video : ‘त्या’ शाळकरी विद्यार्थ्याचं भाषण ऐकून सगळे पोट धरून हसले

Viral Video : ‘त्या’ शाळकरी विद्यार्थ्याचं भाषण ऐकून सगळे पोट धरून हसले

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं एका लहानग्या विद्यार्थ्यानं (Students Speech) केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल (Social Media)झालाय. या चिमुकल्यानं आपल्या लयबद्ध बोलण्यातून लोकशाही (Democracy)व्यवस्थेचं महत्त्व पटवून सांगितलंय.

या लहानग्या विद्यार्थ्यानं आपल्या भाषणात म्हटलंय की, खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता… दोस्ती करू शकता… प्रेमानं राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला… खोड्या करायला… रानात फिरायला… माकडासारखं झाडावर चढायला आवडतं. असं केल्यामुळं माझे बाबा मला मारत नाहीत. कारण, ते लोकशाहीला मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात.

लोकशाहीची मूल्यं आतंकवादी जसे पायदळी तुडवतात, तसं सर मला कधी-कधी पायदळी तुडवतात. कधी-कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,’ असं या लहानग्या विद्यार्थ्यानं त्याच्या भाषणात म्हटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. पण हा व्हिडीओ नक्की कोणत्या शाळेतील आहे? हे मात्र आत्तापर्यंत समजू शकलेलं नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube