ऐन थंडीच्या कडाक्यात अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

ऐन थंडीच्या कडाक्यात अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत

मुंबई : राज्यात थंडीचा जोर कायम असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं हजेरी लावलीय. सध्या वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसताहेत. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र चांगलाच धास्तावलाय. या पावसामुळं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची दाट शक्यता आहे.

दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावलीय. विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय. या पावसामुळं हाती आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता आहे. या पावसानं तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात विजासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

आज मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. बुधवारी 4 जानेवारीला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. दोन दिवसांपासून तिथे ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. या दोन्ही जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास हलक्या पावसानं हजेरी लावली. या पावसाचा पिकांवर परिणाम होत आहे. ढगाळ हवामानाचा जिल्ह्यातील तूर आणि पालेभाज्यांना पिकांना मोठा फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळं तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झालाय. अवकाळी रिमझिम पावसामुळं पालेभाजी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली जातेय.

सध्या राज्यभरात चांगलाच गारठा वाढला असताना काही भागात मात्र, पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. सातत्यानं वातावरणात बदल होताहेत. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. अतिवृष्टी झाल्यानं आधीच मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातची पीकं वाया गेली आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांवरचं आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube