Aurangabad : फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराचा इतिहास, मागणी किती जुनी आहे?
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) आणि धाराशिवचे नामांतर करण्याचा प्रश्न होता. अखेर केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे चे नामांतर ‘धाराशिव’ करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी या दोन्ही शहराच्या नामांतराची घोषणा केली होती. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या निर्णयाला स्थिगिती दिली आणि संभाजीनगरच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करून केंद्रकडे प्रस्ताव पाठवला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू होते. हिंदुत्ववादी संघटनांकडून नामांतराची मागणी केली जात होती. आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.
नामांतराची मागणी कधीपासून?
सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?
औरंगाबाद च्या नावाचा इतिहास काय ?
आजच्या औरंगाबाद शहराबद्दल इतिहासात अनेक उल्लेख आढळून येतात पण त्यामध्ये काही मुद्द्यावर एकमत दिसत नाही. पण आज ज्या परिसरात हे शहर वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. राजा विक्रमादित्य याच्याही काळात या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे.
कारण याच शहरात अगदी प्राचिन असं खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरुन या शहराचं नाव खडकी पडलं असावं, अशी इतिहासात नोंद आहे. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीचे सम्राट राजे कृष्णदेव राय यांच्या वंशजांचे म्हणजेच यादवांचे राज्य होते. काही इतिहासकारांच्या मते सन १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहनगर ठेवले होते.
मलिक अंबर १६२४ साली मरण पावला. त्यानंतर औरंगजेबाने फतेखानाचा पराभव करीत खडकी जिंकले तेव्हा पहिल्यांदा शहाजहान याने औरंगजेबाला पत्र लिहिले. त्यात त्याने पहिल्यांदा या शहराचा उल्लेख औरंगजेबाने जिंकले या अर्थाने औरंगाबाद असा केलेला आहे असा संदर्भ यदुनाथ सरकार यांच्या ‘हिस्ट्री ऑफ औरंगाबाद’ या पुस्तकात आहे. प्रत्यक्ष औरंगजेब मात्र या शहराचा उल्लेख खुजिस्ता बुनियाद (श्रेष्ठतेचा पाया) असा करायचा.
फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर
१६२६ : मलिक अंबरचा मुलगा फतेह खानने फतेहनगर नाव दिले.
१६३६ : शहाजहान बादशहाने औरंगजेबाला इथे पाठवले. त्याने ‘खुजिस्ता बुनियाद’ नाव दिले.
१६५७ : औरंगजेबाने पुन्हा नाव बदलून ‘औरंगाबाद’ केल.
१९८८ : औरंगजेबाच्या नावाला विरोध करून बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ची घोषणा केली.
१९९५ : युती सरकारने घेतला दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. पण नंतर प्रकरण कोर्टात गेले.
१९९९ : काँग्रेस सरकारने नामांतराचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे कोर्टात सांगितले.
१९ जून २०२२ : उद्धव ठाकरे सरकारची संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी.
१६ जुलै २०२२ : ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करून शिंदे सरकारकडून मंजुरी.
२४ फेब्रुवारी २०२२ : केंद्र सरकारकडून नामांतराला मंजुरी