पारा आणि शिसेयुक्त ‘गोरी ब्युटी क्रीम’मुळे कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका; एफडीएने दिले कठोर आदेश
दूध, पनीर, खाद्यपदार्थ, औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांवर सातत्याने धाडी टाकत एफडीएने ऍक्शन मोड स्वीकारला आहे.
FDA issues strict orders : तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्या उत्पादकांविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. दूध, पनीर, खाद्यपदार्थ, औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांवर सातत्याने धाडी टाकत एफडीएने ऍक्शन मोड स्वीकारला असून, आता एका लोकप्रिय फेअरनेस क्रीमविरोधातील धक्कादायक अहवालामुळे सौंदर्य प्रसाधन उद्योगात खळबळ उडाली आहे.
‘गोरी ब्युटी क्रीम’मध्ये विषारी धातूंचा सापळा
गोरेपणाचे आकर्षक स्वप्न दाखवत बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होणारी गोरी ब्युटी क्रीम नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत असल्याचे एफडीएच्या अधिकृत तपासणीत उघड झाले आहे. या क्रीममध्ये अत्यंत विषारी जड धातू असलेले पारा (मर्क्युरी) आणि शिसे (लेड) निर्धारित सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे हे उत्पादन मानवी वापरासाठी असुरक्षित ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या खरेदी, विक्री, वितरण आणि वापरावर तातडीने बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
कामठी आणि इतवारीतील धाडीत मोठा साठा जप्त
एफडीएच्या विशेष पथकाने एप्रिल महिन्यात नागपूरजवळील कामठी तसेच नागपूर शहरातील इतवारी परिसरात छापेमारी करत या क्रीमचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त केला होता. संशयित उत्पादनांचे नमुने 10 मे रोजी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. सुमारे दोन महिन्यांच्या तपासणीनंतर प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालात या क्रीममधील धोकादायक रासायनिक घटकांचा पर्दाफाश झाला आहे.
पुण्यात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; मथुरा प्युअर व्हेज बंद, 7 रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, पारा आणि शिसे यांसारख्या जड धातूंचा दीर्घकाळ त्वचेच्या संपर्कात येणे अत्यंत घातक ठरू शकते. अशा घटकांमुळे त्वचेवर पुरळ, ॲलर्जी, जळजळ, त्वचेचा रंग बदलणे, काळे डाग पडणे आणि त्वचेची नैसर्गिक रचना बिघडणे यांसारखे परिणाम होऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन वापरामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो.
विक्रेत्यांना तत्काळ निर्देश
अहवाल प्राप्त होताच एफडीएने संबंधित उत्पादनाचा साठा बाजारातून तातडीने परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. विक्रेते, वितरक आणि घाऊक व्यापाऱ्यांना या उत्पादनाची विक्री त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या उत्पादनाची पुढील चौकशी सुरू असून, उत्पादक कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
एफडीएने नागरिकांना जाहिरातींमधील आकर्षक दावे आणि गोरेपणाच्या हमींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही सौंदर्य प्रसाधन वापरण्यापूर्वी त्यावरील घटक, उत्पादन परवाना आणि गुणवत्ता प्रमाणपत्रांची खातरजमा करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे ‘गोरी ब्युटी क्रीम’चा साठा आहे त्यांनी त्याचा वापर तात्काळ बंद करून जवळच्या विक्रेत्याशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात एफडीए अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या काळात अशा उत्पादनांवर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.