बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’सह 500 ट्रॅप कॅमेरे तैनात; मंत्री विखे पाटील यांची माहिती

बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे ‘थर्मल ड्रोन’, ‘नाईट व्हिजन कॅमेरे’ व 500 हून अधिक ‘ट्रॅप कॅमेरे’ तैनात असल्याच माहिती.

  • Written By: Published:
Untitled Design (140)

Forest department uses ‘hi-tech’ system to prevent leopard attacks : संगमनेर तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर व मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने ‘हायटेक’ यंत्रणेचा वापर करावा. ज्या भागात बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे ‘थर्मल ड्रोन’, ‘नाईट व्हिजन कॅमेरे’ व 500 हून अधिक ‘ट्रॅप कॅमेरे’ तैनात करण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Minister Radhakrushn Vikhe Patil) पाटील यांनी दिली आहे.

संगमनेर(Sangamner) तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकल्या सिद्धेश सुरेश कडलग याच्या कुटुंबीयांची पालकमंत्री.विखे पाटील यांनी आज निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, उपविभागीय अधिकारी अरूण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी मृत सिद्धेशचे आजोबा, आजी, वडील सुरेश कडलग व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी असून शासन या दुःखद प्रसंगी पूर्णपणे कडलग कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व वन विभागाचे लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Heramb Kulkarni : नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचे 70 उमेदवार: 42 टक्के एकट्या भाजपाचे

बिबट्या प्रवण क्षेत्रात प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनेबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, वन विभागाच्या ताफ्यात नव्याने 22 गस्ती वाहने व 5 नवीन गन (बंदुका) दाखल होत आहेत. ही मोहीम पुढील 4 ते 6 महिने प्रभावीपणे राबविण्यात येईल. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

22 जानेवारीपर्यंत रस्ते व कालव्यांवरील अतिक्रमण काढा

बिबट्याच्या हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कालव्यांच्या कडेला व वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी दिले. हे रस्ते ‘सार्वजनिक हिताचे’ असल्याने प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून, येत्या 22 जानेवारीपर्यंत रस्ते मोकळे करावेत व त्यांचे मुरमीकरण करून ते वाहतुकीयोग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

Video : पार्थ पवारांवर गुन्हा अन् अजित पवारांचा राजीनामा; दमानिया अन् कुंभार आक्रमक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकसहभागाची गरज

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांच्या संरक्षक भिंतींची उंची वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, वाड्या-वस्त्यांवरून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून पुढाकार घेण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. रोटेशन पद्धतीने ट्रॅक्टर किंवा सुरक्षित वाहनांची व्यवस्था करून मुलांना शाळेत सोडणे व आणणे ही पद्धत अवलंबल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘रेसक्यू सेंटर’ची संकल्पना 

यावेळी वन संवर्धन व पर्यटनाला चालना देण्यासाठी गोरक्षनाथ गड परिसरातील वन विभागाच्या 200 ते 250 एकर जमिनीवर बिबट्यांसाठी ‘रेसक्यू सेंटर’ विकसित करण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी मांडली. ही जागा वन विभागाकडे हस्तांतरित करून तिथे निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us