मोठी बातमी, भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांना बँकेत 112 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक
सहकारी क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. तसेच ते काही प्रमुख राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याची चर्चा होती.
Former BJP state minister in Maharashtra arrested : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगावकर याला अखेर मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. दीर्घकाळापासून फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड तालुक्यातील विंग गावात छापा टाकत त्याला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
शेखर चरेगावकर हे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष असून जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. तसेच ते काही प्रमुख राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याची चर्चा होती. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर त्यांना तातडीने न्यायालयात हजर करण्यात आले असता कराड न्यायालयाने दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, मालमत्ता आणि अन्य संशयितांबाबत चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणात यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप आहे. बँकेतील ठेवीदारांच्या पैशांचा अपहार करून बनावट कर्जप्रकरणे, खोटे खाते व्यवहार आणि संबंधितांना लाभ मिळवून देण्याचे प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 12 ऑक्टोबर 2025 रोजी या संदर्भात कराड पोलीस ठाण्यात सुमारे 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये संचालक मंडळातील काही सदस्य, अधिकारी तसेच संबंधित व्यावसायिकांचा समावेश असल्याचे समजते.
भिगवण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ‘मला आईकडे जायचंय’, न्यायालयात मुलीने जबाब बदलला…
तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने चरेगावकर यांच्या निवासस्थानी तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. या छापेमारीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ईडीकडून मनी लॉन्डरिंगच्या अनुषंगाने स्वतंत्र तपासही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
याआधीच चरेगावकर यांचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडूनही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील पैशांचा प्रवाह, संबंधित कंपन्या, मालमत्ता व्यवहार आणि लाभार्थी यांचा सखोल तपास करत आहे. काही मालमत्ता गोठवण्याची कारवाईही लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची बचत बँकेत ठेवली होती. त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर सत्य बाहेर यावे आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेवर या प्रकरणाचा परिणाम झाल्याचेही जाणवू लागले आहे.
मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असून, या बहुचर्चित घोटाळ्याच्या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
