“गुरुजीला अटक करा बोलला” : भिडेंविरोधातील भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा मेल

“गुरुजीला अटक करा बोलला” : भिडेंविरोधातील भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा मेल

कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना धमकीचा मेल आला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरानंतर चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसंच कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. (Former Chief Minister and senior Congress leader Prithviraj Chavan has received a threatening email)

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12.25 मिनिटांच्या सुमारास चव्हाण यांच्या ईमेलवर ही धमकी आली. “तु गुरुजीला अटक कर बोला xxxxxxx, तुला जगायचं नाही का” अशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली. अंकुश सौरते असं धमकी देणाऱ्या युवकाचे नाव असून प्राथमिक तपासात हा ईमेल नांदेड येथून आला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून पोलिसांचे एक पथक नांदेडला जाण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची संभाजी भिडेंविरोधात भूमिका :

इतरवेळी संयमात दिसणारे पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांपूर्वी विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, भिंडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान अत्यंत निंदनीय आणि वादग्रस्त असून, सरकारने तातडीने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, तसेच त्यांना IPC 153 अंतर्गत अटक करावी, संभाजी भिडे यांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार आहे. अशा व्यक्तीला सरकारने ताबडतोब अटक करावी. अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करणारी व्यक्ती बाहेर फिरूच कशी शकते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडेचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे भाजपाचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकुर, आमदार कुणाल पाटील यांनीही भिडेंच्या विरोधात आंदोलन केले. राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्यावतीने भिडेंच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. अशात आता पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा मेल आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube