‘कराडांना मंत्री झाल्यानंतर मस्ती आली’; कथित ऑडिओतील उल्लेखामुळे भाजपच्या गोटात नवा वाद?

व्हायरल ऑडिओमध्ये डॉ. भागवत कराड रावसाहेब दानवे यांच्याशी असलेल्या मतभेदांचा उल्लेख करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 31T152913.907

Former Minister Bhagwat Karad’s call recording goes viral : राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे नंदुरबारमधील पदाधिकारी विजय चौधरी आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यातील असल्याचा दावा करण्यात येणारी ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित संभाषणात भाजपमधील अंतर्गत राजकारण, मंत्रिपद वाटप, संघटनात्मक निर्णय तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबाबत काही महत्त्वाच्या चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नसल्याने या सर्व दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

व्हायरल ऑडिओमध्ये डॉ. भागवत कराड रावसाहेब दानवे यांच्याशी असलेल्या मतभेदांचा उल्लेख करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या कथित संभाषणानुसार, डॉ. भागवत कराड आणि अतुल सावे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे नाराज झाल्याचे सांगितले गेले आहे. तसेच, आम्हाला वरूनच देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले होते आणि त्यानुसार आम्ही काम करत होतो, असेही या कथित संभाषणात म्हटल्याचे समोर आले आहे.

या ऑडिओमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख असल्याचा दावा आहे. त्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता, तर आपण फुलंब्री मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा कथित उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी रावसाहेब दानवेही उपस्थित असल्याचे या संभाषणात म्हटले गेले आहे.

सिस्पे घोटाळ्यातील आरोपींचा दुबई ते फिजीपर्यंत पाठलाग; खासदार निलेश लंके यांचा मोठा दावा

कथित ऑडिओमध्ये पुढे रावसाहेब दानवे, अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यातील काही बैठकींचा उल्लेख करण्यात आला आहे. एका प्रसंगी रावसाहेब दानवे यांनी कराडांना मंत्री झाल्यानंतर जास्त मस्ती आली आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा दावा या संभाषणात करण्यात आला आहे. हा संवाद बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाल्याचेही कथितपणे सांगितले गेले आहे. जिल्हाध्यक्ष निवड, संघटनात्मक नियुक्त्या आणि स्थानिक राजकारणातील काही मतभेदांचाही या संभाषणात उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, या कथित संभाषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि भूपेंद्र यादव यांच्याबाबतही चर्चा झाली आहे. मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर काही नेत्यांच्या राजकीय अपेक्षा वाढल्याचा उल्लेखही कथित ऑडिओमध्ये असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विरोधकांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना भाजपकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

राजकीय क्षेत्रात यापूर्वीही अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. मात्र, कोणत्याही ऑडिओची अधिकृत पडताळणी आणि सत्यता सिद्ध होईपर्यंत त्यातील दावे अंतिम मानले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे भागवत कराड आणि विजय चौधरी यांच्यातील असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या या कथित ऑडिओ क्लिपबाबत संबंधितांकडून येणारी प्रतिक्रिया आणि संभाव्य चौकशी याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us