गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीच्या दुधासाठी आता मोजावे लागणार 78 रुपये!
Gokul Warna Milk Price Hike: गोकुळनंतर वारणा दूध संघानेही म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 6 रुपयांची वाढ केली.
Gokul Warna Milk Price Hike: कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Union) म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपयांची वाढ केल्यानंतर आता वारणा दूध संघानेही (Warna Milk) दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
वारणाकडूनही म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात 6 रुपये, तर खरेदी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळपाठोपाठ वारणाचे दूधही महागले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार असून, कोल्हापूर परिसरात म्हशीच्या दुधाचा दर आता प्रतिलिटर 78 रुपयांवर पोहोचला आहे.
गोकुळनंतर वारणाचीही दूध दरवाढ
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दूध दरवाढीचा निर्णय चर्चेत आला होता. गोकुळने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपयांची, तर खरेदी दरात 3 रुपयांची वाढ केली. गोकुळच्या इतिहासातील विक्री दरातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे 6 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
वारणाच्या म्हशी आणि गायीच्या दुधाचे दरही वाढले
गोकुळच्या दरवाढीनंतर ग्राहकांनी तुलनेने स्वस्त असलेल्या वारणाच्या दुधाला पसंती दिल्याचे चित्र होते. मात्र, आता वारणा दूध संघानेही दरवाढ लागू केली आहे. म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपये, तर खरेदी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय गायीच्या दुधाच्या विक्री दरात 4 रुपये आणि खरेदी दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
म्हशीच्या दुधासाठी आता 78 रुपये मोजावे लागणार
गोकुळ आणि वारणा या दोन्ही दूध संघांनी दरवाढ केल्याने कोल्हापूर परिसरातील ग्राहकांना आता म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर 78 रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या दरांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकाच वेळी झालेल्या या दरवाढीमुळे दूध खरेदीचा मासिक खर्च वाढणार असून, सर्वसामान्य कुटुंबांच्या घरखर्चाचे गणितही बिघडण्याची शक्यता आहे.