तासिका तत्वावरील अध्यापकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ; चंद्रकांत पाटलांची माहिती
मुंबई : राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अध्यापक भरती ही बंद आहे. त्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर अध्यापकांना संस्था, महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलं जातं. त्यांना मिळणार वेतन हे अपुरं असल्याची सातत्याने ओरड होते. आजच्या महागाईच्या काळात मिळणारं तासिका वेतन हे अत्यल्प असल्यानं तासिका वेतन वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्यातील अध्यापक संघटनांनी केली होती. दरम्यान, आता राज्यातील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सेवा देणाऱ्या अध्यापकांसाठी आनंदाची बातमी आहे. तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यादृष्टीने रिक्त असलेल्या अध्यापकांच्या जागांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. अशा अध्यापकांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते. मात्र, तासिका तत्वावर काम करतांना मिळणार मानधन हे अत्यल्प आहे. मात्र, आता राज्य सरकार तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याच्या विचारात आहे. आता तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गंत असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रम शिकवलेल्या अध्यापकांना मिळणारं मानधन हे 625 रुपयांवर 1 हजार रुपये प्रति तास असं केलं. तर पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या अध्यापकांचं मानधन हे 750 रुपये प्रतितासावरून आता 1 हजार रुपये प्रति तास केलं आहे. तर शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता 750 रुपयांवरुन 1 हजार रुपये प्रति तास एवढं मानधन केलं.
पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर मिळणार नवा शहराध्यक्ष?
तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या संस्थामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या अध्यापकांना मानधनात 400 रुपयांनी वाढ केली. यापूर्वी या अध्यापकांना मिळणारं वेतन हे 600 रुपये एवढं होतं. तर आता या मानधनात वाढ करून 1 हजार रुपये प्रति तास एवढ मानधन देण्यात येणार आहे.
पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या अध्यापकांना मिळणाऱ्या मानधनात 300 रुपयांची वाढ केली. आता हे मानधन 800 रुपये प्रति तास इतकं झालं आहे. तर या संस्थामध्ये उद्योग व्यवसाय क्षेत्रातून मार्गदर्शन करण्यासाठी येणाऱ्या निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांना व्याख्यानासाठी मिळणार मानधन 500 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. आता हे मानघन 1 हजार 500 प्रति तास एवढं असेल.
कला संचालनालय अंतर्गत असलेल्या संस्थामध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञांना मिळणार मानधन 750 रुपये एवढं होतं. आता या मानधनात वाढ करून ते 1 हजार 500 प्रति तास करण्यातं आलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा हा राज्यात तासिका तत्वावर शिकवणाऱ्या अध्यापकांना होणार आहे. दरम्यान, याची निर्णयाची अंमलबजावणी कधी होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.