उदय सामंतांच्या मिशनला यश, आठ दिवसांच्या मनधरणीनंतर गोकुळ गितेंचे बंड थंड, नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गोकुळ गीते यांनी त्यांच्या बंडाची तलवार म्यान केली.
Has Gokul Gite’s rebellion cooled down after some persuasion? : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभे राहिलेले सर्वात मोठे आव्हान अखेर दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गोकुळ गीते यांनी आज त्यांची बंडाची तलवार म्यान केलीआहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून रंगलेले राजकीय मानधरणीचे नाट्य आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
या घडामोडींना वेग देण्यासाठी शिवसेनेचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत विशेष विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले. ते थेट गणेश गिते आणि गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र या बैठकीत घडलेल्या एका दृश्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. बैठकीच्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे उपस्थित असताना देखील उदय सामंत, गणेश गिते आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी ज्या खोलीत चर्चा करत होते, त्यापासून दूर दुसऱ्या खोलीत दराडे बंधू बसलेले दिसून आले. या घडामोडींमुळे अनेक तर्कवितर्कांनां उधाण आले आहे.
आम्ही मृतदेहाचे लिंग..,; प्रणितच्या शोमध्ये महिला डॉक्टर बरळली, नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली!
दरम्यान, गोकुळ गिते यांच्या देहबोलीने देखील राजकीय चर्चांना नवा रंग दिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेण्याची तयारी दाखवली असली, तरी बैठकीदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्यांची शांत आणि संथ देहबोली अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली. गोकुळ गिते हे स्वेच्छेने मागे होतआहेत की, वरिष्ठ नेत्यांचा शब्द राखण्यासाठी आणि पक्ष नेतृत्वाच्या दबावामुळे हा निर्णय घेत आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या संपूर्ण घडामोडींची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. काल मुंबईत गणेश गिते आणि गोकुळ गिते या बंधूंची उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. या बैठकीनंतरच बंड शमविण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. गिते बंधूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तरीही वरिष्ठ नेत्यांनी फोनवरून घेतलेल्या पुढाकारामुळेच हे बंड थंड झाल्याचे बोलले जात आहे.
गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून प्रत्यक्ष प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात सुकर झाला आहे. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने गोकुळ गिते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण होणार असली, तरी प्रत्यक्ष लढतीचे चित्र आता बदलण्याची शक्यता आहे.