Rashtriya Swayamsevak Sangh : जबाबदारी ओळखून प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी योगदान देणे आवश्यक

Rashtriya Swayamsevak Sangh : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे छत्र आपल्या जीवनावर असले पाहिजे. त्यांच्या छायेखाली या देशातील

Rashtriya Swayamsevak Sangh

Rashtriya Swayamsevak Sangh : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे छत्र आपल्या जीवनावर असले पाहिजे. त्यांच्या छायेखाली या देशातील सामान्य तरुणांच्या मनात राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचा भाव निर्माण झाला पाहिजे. शिवाजी महाराज संन्यासी नव्हते. त्यांनी संसार केला, कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि त्याचबरोबर स्वराज्याची निर्मितीही केली. त्यामुळे संसार आणि राष्ट्रकार्यासाठीचे कर्तव्य यांचा समतोल कसा साधायचा, हे त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे आहे. आज राष्ट्राला योग्य दिशा देण्याची वेळ आली आहे. ही जबाबदारी ओळखून प्रत्येकाने आपल्या परीने राष्ट्रहितासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व रा.स्व. संघ नऱ्हे, सिंहगड रस्ता तर्फे स्व. तानाजी बाबर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन न-हे येथील शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी हेमंत हरहरे यांचे हिंदू साम्राज्य दिन या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला रा. स्व. संघ सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपप्राचार्य अमोल काळे, सुषमा तानाजी बाबर, रोहित तानाजी बाबर, रावजी बडवे आदी उपस्थित होते.

हेमंत हरहरे म्हणाले, छत्रपती शिवराय यांचे राज्य सर्वधर्मसमभावावर नव्हे, तर भेदभावमुक्त आणि न्यायाधिष्ठित व्यवस्थेवर उभे होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आजही आपण जातीय भेदभावात इतके अडकलो आहोत की प्रत्येक जात आपापल्या टोकाच्या भूमिका घेत उभी आहे. माझी जात कशी मोठी, हा विचार समाजात आणि देशात वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायांनी भेदभावमुक्त राज्य कसे उभे केले, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. शिवरायांनी सर्वसामान्यांच्या मनात विश्वास, न्याय आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे समाज आणि समाज म्हणजे संघ. संघाने सुरुवात करायची आणि समाजाने ती उचलून धरायची. कारण कर्तृत्वाचा आदर्श केवळ संघात नसून संपूर्ण समाजात आहे. आजही हिंदू समाज एकत्र येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे चित्र दिसते. इतकेच नव्हे, तर आजही खरे हिंदुत्व कोणाचे, यावर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात हिंदुत्व हे एकच असते त्यात खरे-खोटे किंवा दोन वेगवेगळे प्रकार असू शकत नाहीत. तरीदेखील आजही त्यावर वाद आणि चर्चा सुरूच आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, बाळासाहेबांचा उल्लेख अन् कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, युवकांमध्ये अफाट शक्ती आणि सामर्थ्य असते. मात्र त्या शक्तीची ओळख होणे गरजेचे आहे. युवावस्था पुन्हा पुन्हा मिळत नाही. आयुष्यातील एका विशिष्ट वयातच आपण स्वतःच्या जीवनाला आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकतो. ती संधी एकदा निघून गेली, तर ती पुन्हा परत येत नाही. जर आपण केवळ मोबाईलवर रील्स पाहण्यात आणि वेळ वाया घालवण्यात रमलो, तर आपले जीवन व्यर्थ जाईल. हेच वय स्वतःला घडवण्याचे आहे. म्हणून अशा व्याख्यानांतून मिळणारे चांगले विचार आत्मसात करून ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. अजय गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.

follow us