‘त्या’ हल्ल्यातला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला…,गौतम अदानींनी सांगितलं
मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील अतिरेक्यांनी केलेला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला असल्याचं उद्योजक गौतम अदानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. यावेळी त्यांच्यावर कोणता प्रसंग आला होता त्याचं वर्णनही त्यांनी यावेळी केलं आहे.
26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला आत्तापर्यंतचा अतिरेक्यांचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यात जवळपास 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते.
या हल्ल्याबाबत सांगताना अदानी म्हणाले, माझे दुबईहून काही मित्र आले होते. आम्ही ताज हॉटेलमध्ये जेवण करत होतो. जेवण केल्यानंतर बिल भरुन आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. मात्र, पुन्हा आम्ही कॉफी पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. दहा वाजताच्या सुमारास अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये हल्ला केला. मी अतिरेक्यांना पाहिलं होतं. त्यांनी गोळीबार केल्याचं मी डोळ्याने पाहिलं होतं.
त्यावेळी आम्ही काही लोकं अडकल्याचं ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी मला एका चेंबर्समध्ये नेलं होतं. मी रात्रभर चेंबर्समध्ये होतो. त्यावेळी मी मरण डोळ्यानं पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कंमाडोज आले तेव्हा त्यांनी आम्हांला हॉटेलच्या बाहेर काढलं आणि मग मी सकाळी 7 च्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर आलो.
हल्ल्याच्यावेळी ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पध्दतीने काम केलं ते मी फार कमी हॉटेल्समध्ये पाहिल्याचं गौतम अदानी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मी माझ्या आयुष्यात दोनदा फार जवळून मरण पाहिलंय. दोन्हीवेळी मी देवाच्या आशीर्वादाने वारंवार वाचलो आहे.
एकदा किडनॅपच्या घटनेला देखील मी सामोरे गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, ज्या दिवशी माझं किडनॅप झालं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला किडनॅपरने सोडलं होतं. त्या दिवशी मला रात्री चांगली झोप आली होती. आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. अशा गोष्टी कोणी विसरतं तर कोणी विसरत नसल्याचं अदानी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या हल्ल्यात जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. हा हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये शिरकाव केला होता.