नागपुरमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत, महाविकास आघाडीत बिघाडी

नागपुरमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत, महाविकास आघाडीत बिघाडी

नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे इटकेलवार, काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबोले, भाजप पुरस्कृत नागो गाणार यांच्यात थेट लढत होणार आहे.

त्यामुळे आता नागपूर शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. विद्यमान आमदार असलेले गाणार, काँग्रेसचे अडबोलेस इटकेलवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. आत्तापर्यंत भाजपने या मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिला नसल्याचा इतिहास आहे. भाजपकडून आजमितीपर्यंत नागो गाणार यांनाच पाठिंबा देण्यात आला होता. यंदाच्या निवडणुकीतही भाजपकडून कोणताही उमदेवार न देता गाणार यांनाच पाठिंबा दिल्याचं जाहीर करण्यात आलंय.

तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार सतिश इटकेलवार यांना अर्ज माघारी घेण्याचा आदेश दिल्यानंतरही त्यांनी आपला अर्ज माघारी न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

त्यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आहे. चुरशीच्या लढतीसाठी दोन्ही पक्षांसह इटकेलवार यांनी कंबर कसली असून ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे यांनी देखील आपला उमदेवारी अर्ज माघारी घेतला आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर मी माझ्या उमेदवारीचा अर्ज मागे घेत असल्याची माहिती गंगाधर नाकाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. आता नागपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने सुधाकर अडबोले तर भारतीय जनता पक्षाकडून नागो गाणार, इटकेलवार यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र दिसून येतंय. चुरशीच्या होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहण उत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, नागपूर मतदारसंघासाठी एकूण ३९ हजार ३९३ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली असून यामध्ये २२ हजार ७०४ पुरूष, तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४ हजार ३८४ मतदारांची वाढ झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube