‘हिटलर’चं नाव घेत पोस्ट केली, नंतर डिलीट केली तरीही इस्त्रायल भडकलाच; राऊतांनी नेमकं काय केलं?
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे इस्त्रायल (Israel) खवळून उठला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर इस्त्रायलने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता इस्त्रायली दूतावासाने विदेश मंत्रालय आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून या पत्रात संजय राऊतांच्या ट्विटरवरील पोस्टबाबत टीका केली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तनुसार, 14 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी गाझातील (Gaza City) अल शिफा रुग्णालयातील परिस्थितीबाबत एक रिपोर्ट शेअर केला होता. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी ‘हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होते हे आता समजतंय का?’ असं म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टवरून मोठा गदारोळ उडाला होता त्यामुळे त्यांना ही पोस्ट डिलीट करावी लागली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. कारण ही पोस्ट आता इस्त्रायलच्या दूतावासापर्यंत पोहोचली आहे. त्यावरूनच दूतावासाने लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले.
Israel Hamas War : युद्ध थांबणार ? ‘त्या’ कराराला इस्त्रायलने दिली मंजुरी
संजय राऊतांनी शेअर केलेल्या बातमीत नेमकं काय ?
संजय राऊतांनी जी बातमी शेअर केली होती त्यात इस्त्रायलच्या हमल्यांनंतर अल शिफा रुग्णालयात काय परिस्थिती होती हे सांगितले होते. सशस्त्र दलांनी रुग्णालयाला चारही बाजूंनी वेढा टाकला होता. त्यामुळे या दवाखान्यातील महिला आणि नवजात बालकांची गैरसोय होत असल्याचे या बातमीत म्हटले होते.
संजय राऊतांनी केला खुलासा
युद्धाचे पण काही नियम असतात, महाभारत काळापासून ते सुरू आहेत. इस्रायलमध्ये जाऊन हमासने निर्घृणपणे हल्ला केला. ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे हमासच्या अतिरेक्यांकडून ज्या पद्धतीने बंदी करून हत्या केली जात आहे, त्याचा आम्ही धिक्कार केला. नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यांचं दूध पाणीपुरवठा थांबवला गेला. मुलं तडफडत होती त्यावर मी एक टिप्पणी केली त्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भारतातील नेहरुंची जी भूमिका होती तीच आमचीही आहे. हिटलरचा संदर्भ दिला मात्र त्यानंतर मी संदर्भ काढून टाकला. सामनामधून मी लेख लिहिला त्यात लिहिलं हिटलर हा भारताचा मोठा शत्रू आहे.