Jai Jai Maharashtra maza : राज्यगीत म्हणून घोषित, शिवजयंतीपासून अंमलबजावणी

Jai Jai Maharashtra maza : राज्यगीत म्हणून घोषित, शिवजयंतीपासून अंमलबजावणी

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत (maharashtra Song) म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji maharaj)यांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्याचबरोबर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Cabinet Decision) इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

• खासगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर 12 नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय. त्याकरिता अटींचीं पूर्तता करणे आवश्यक. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

• महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50 व्या बैठकीतील शिफारस क्र. 34 नुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता. आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. (सामान्य प्रशासन विभाग)

• सन 2022 च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाव्दारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून देणार. (वन विभाग )

• महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2012 या विधेयक मसुदा सादर करण्यास मान्यता. परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार. यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार. (उद्योग विभाग )

• भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस. आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित. (सामान्य प्रशासन विभाग)

• राज्यात दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ. गाईसाठी 70 हजार रुपये, म्हशीसाठी 80 हजार रुपये. (पशुसंवर्धन विभाग)

• फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार. (गृह विभाग)

• महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात 1 हजार 225 वरुन 2500 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय. (महिला व बाल विकास विभाग)

• पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास 3976 कोटी 83 लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात 10 हजार 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. (जलसंपदा विभाग)

• पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस 460 कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील 63 गावात 25 हजार 498 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार. (जलसंपदा विभाग)

• नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार. 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व 1 लाख रोजगाराची निर्मिती. (नगरविकास विभाग)

• ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. सदर योजना केवळ जिल्हास्तरावरुन अथवा राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक न्याय विभागाच्या “अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना” व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार. (आदिवासी विकास विभाग)

• महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा. शैक्षणिक इमारतींची उंची 30 मीटर वरुन 45 मीटर करणे, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद. (नगर विकास विभाग)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube