ऊस रोपातून केलेली लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान, कर्मवीर कृषी महोत्सवात डॉ. अंकुश चोरमुले यांचं प्रतिपादन

आधुनिक नर्सरी तंत्रज्ञान, ड्रिप सिंचन आणि अचूक खत व्यवस्थापन यांचा संगम केल्यास ऊस उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 09T223228.977

आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. (Karmaveer) त्यामुळे ऊस लागवडीसाठी ‘ऊस रोप पद्धती’ ही आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञानाधारित पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ.अंकुश चोरमुले (एम.डी.गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज, सांगली) यांनी केले आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोसाकाच्या माध्यमातून नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. ‘शंकररावजी काळे साहेब’ या नावामध्ये ताकद होती, विश्वास होता आणि त्यांनी दिलेला शब्द हा प्रमाण होता. त्यांनी जाहीर केलेला ऊसाचा दर नक्की मिळणार असा अतूट विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नेहमीच प्रथम कोसाकाला ऊस देण्यास प्राधान्य दिले. त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वधिक दर देण्याचा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ऊस विकास योजनेद्वारे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी अनेक धडक कार्यक्रम  अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे व संचालक मंडळ राबवीत आहे.

त्या पार्श्वभूमीवर मा.खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणा निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ अंतर्गत शनिवार (दि.०८) रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्व हंगामी व सुरू ऊस व्यवस्थापन या विषयावर डॉ.अंकुश चोरमुले यांच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ऊस रोप पद्धतीतून तयार होणाऱ्या रोपांची गुणवत्ता आणि उगवण क्षमता उत्कृष्ट असते. त्यामुळे ऊस लागवड अधिक नियोजनबद्ध आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

संताच्या बरोबरीचे कर्मवीर शंकररावजी काळेंचे सामाजिक कार्य: डॉ.विजयकुमार फड

आधुनिक नर्सरी तंत्रज्ञान, ड्रिप सिंचन आणि अचूक खत व्यवस्थापन यांचा संगम केल्यास ऊस उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे. ऊस तोडणी हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी ऊस तोडल्यानंतर उरलेले पाचट जाळण्याची पद्धत टाळावी, ऊस पाचट जाळल्याने मातीतील सेंद्रिय अन्नद्रव्यांचा नाश होतो, जमिनीची सुपीकता कमी होते आणि पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. पाचट जाळल्याने निर्माण होणारा धूर हवेचे प्रदूषण वाढवतो आणि श्वसनविकारांचे प्रमाणही वाढते. याउलट पाचटाची कुट्टी करून मल्चिंगसाठी वापरल्यास जमिनीतील पाणीधारण क्षमता वाढते, गवत वाढ कमी होते आणि उत्पादनातही वाढ होते. पाचट हे शेतकऱ्यांसाठी खतासमान मौल्यवान जैविक साधन आहे. ते जाळण्याऐवजी त्याची कुट्टी करून मातीमध्ये मिसळल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, आर्द्रता टिकते आणि पुढील पिकांसाठी पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारते.

ऊस पाचटाची कुट्टी केल्याने केवळ जमिनीचे आरोग्य सुधारत नाही, तर रासायनिक खतांवरील अवलंबित्वही कमी होते. “शेतीत शाश्वतता टिकवायची असेल तर पाचट जाळू नका त्याचा उपयोग करा. हीच पर्यावरणपूरक आणि फायदेशीर शेतीची खरी दिशा असल्याचे सांगितले. ऊस रोप पद्धतीमुळे पाण्याची बचत होते, तसेच ड्रिप सिंचनासोबत ही पद्धत अवलंबल्यास ऊस उत्पादनात वाढ होवून एकरी उत्पन्न वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी ऊस रोप पद्धतीकडे वळावे असे त्यांनी आवाहन केले.कृषी विभाग, सहकारी साखर कारखाने आणि संशोधन संस्था यांनीही ऊस रोप पद्धतीचा प्रसार केल्यास ऊस उद्योग अधिक सक्षम होईल, असा विश्वास डॉ.चोरमुले यांनी व्यक्त केला.

कर्मवीर कृषी महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी डॉ. चोरमुले यांच्या चर्चा-सत्रात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या प्रात्यक्षिक सादरीकरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस रोप पद्धतीचा अवलंब करण्याचा व ऊस तोडल्यानंतर उरलेले पाचट जाळण्याचा त्याच ठिकाणी संकल्प केला. या चर्चा सत्रासाठी आ.आशुतोष काळे,कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रविण शिंदे, संचालक शंकरराव चव्हाण, श्रीराम राजेभोसले, वसंतराव आभाळे, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवन, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस पैदासकार कैलास भुयटे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:-कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ ला जिल्हाभरातून आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विविध ११३ स्टॉल्सला भेटी देवून शेती संदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली व अनेक कृषी साहित्याची खरेदीही केली. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे यांनी देखील कृषी महोत्सवातील प्रत्येक विविध स्टॉल्सला भेट देत विकसित आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेवून स्टॉल्सधारकांची आपुलकीने विचारपूस केली.

follow us