जय पवारांनी घेतली पिंकी मालीच्या कुटुंबीयांची भेट, ‘पत्रकार परिषद घेणारच’ म्हणत दबावाच्या चर्चांना पूर्णविराम

पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणाचाही माझयावर दबाव नाही, असे स्पष्ट करत पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • Written By: Published:
Untitled Design 11

Jai Pawar met Pinky Mali’s family : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माली हिच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी पिंकी माली यांच्या आईवर शस्त्रक्रिया झाली होती आणि कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आज जय पवार यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केले तसेच दुर्घटनेबाबत देखील सविस्तर चर्चा केली.

भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जय पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणाचाही माझयावर दबाव नाही, असे स्पष्ट करत पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांना व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये असा सल्ला दिल्याचे सांगितले. या दुर्घटनेची CBI चौकशी व्हावी, ही आमची मागणी कायम असल्याचे देखील त्यांनी ठामपणे नमूद केले.

अजितदादांच्या विमान अपघातावरून दिल्ली दरबारात खळबळ; रोहित पवार यांची राहुल गांधींसोबत अर्धा तास चर्चा

दरम्यान, जय पवारांनी एक वेगळी खबरदारी घेतल्याची देखील चर्चा आहे. पिंकी माली यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ते ज्या इमारतीत गेले होते तेथून परतताना त्यांनी 18 मजले उतरून खाली येण्याचा निर्णय घेतला. वर जाताना लिफ्टमधून आवाज येत असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी लिफ्टचा वापर टाळत पायी खाली उतरने पसंत केले. विमान दुर्घटनेच्या दिवशी अजित पवार यांच्यासोबत केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माली यांचा देखील अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना भेटून जय पवार यांनी संवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन बारामती विमान दुर्घटना आणि अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र दिले. या घटनेत कायद्याच्या मूलभूत तत्वांचे पालन झालेले दिसत नसल्याचे नमूद करत अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही, ही बाबही त्यांनी लक्षात आणून दिली. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले. त्यांनी रोहित पवारांसोबतच्या भेटीचा फोटो देखील शेअर केला असून त्यावर रोहित पवारांनी आभार मानले आहेत.

follow us